जन्म झाल्यावर वडिलांनी जवळ घेण्यास दिला होता नकार, तोच मुलगा बनला बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 01:11 PM2024-03-29T13:11:03+5:302024-03-29T13:17:13+5:30
फोटोतील या चिमुकल्या मुलाला ओळखलंत का? आज हा मुलगा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.
बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन' सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी कायमच चर्चेत असतो. नुकतेच गोविंदाने पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोविंदा अहुजा याचा पक्षप्रवेश झालाय. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्याला लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. आता पुन्हा एकदा राजकारणातून गोविंदा एक नवी सुरुवात करत आहेत. बॉलिवूड ते राजकारण असा गोविंदाचा प्रवास सोपा नव्हता. मोठ्या संघर्षानंतर गोविंदा चित्रपटांमध्ये आला आणि स्टार झाला. पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा गोविंदाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला दूर सारलं होतं.
गोविंदाच्या जन्मानंतर वडिलांनी त्याला प्रेमाने जवळदेखील घेतलं नव्हतं. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना गोविंदाने सांगितले की, 'मला चार बहिणी आणि एक भाऊ होता. माझा जन्म झाला तेव्हा माझी आई साध्वी झाली होती. त्यामुळे माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या वडिलांनी मला जवळं घेतलं नाही. कारण माझ्यामुळेच माझी आई साध्वी झाली असे त्यांना वाटत होतं. यामुळे गोविंदाच्या वडिलांची नाराजी त्याच्यावरही होती. पण कालांतराने गोष्टी सुधारल्या'.
गोविदांचे वडील अरुण हे मेहबूब खान यांच्या 'औरत' (1940) चित्रपटात झळकलेले प्रसिद्ध अभिनेते होते आणि त्याची आई निर्मला देवी एक प्रसिद्ध गायिका होत्या. गोविंदाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईला त्याने अभिनेता व्हावे, असे कधीच वाटलं नव्हतं. मात्र, त्यांना वडिलांची तितकीच साथ मिळाली होती. गोविंदानं त्याच्या कारकिर्दीत अनेक हीट चित्रपट दिले आणि मेहनतीच्या जोरावर तो बॉलिवूडचा हिरो नंबर वन बनला.
गोविंदाने आता 14 वर्षांनंतर पुन्हा राजकारणात प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश झाला यावेळी गोविंदा म्हणाला, 'शिवसेनेने मला आपल्या पंखाखाली घेतल्यानं मला खूप बरं वाटलं. शिंदे सरकारचा विकास मी पाहिला आहे. मला वाटतं १४ वर्षांच्या वनवासानंतर मला योग्य जागा मिळाली आहे. रामराज्य मिळालं. मी काहीही मागितले नाही आणि भविष्यात पक्ष जो निर्णय घेईल ते मी करणार आहे'. याआधी गोविंदाने 2004 मध्ये राजकारणात एन्ट्री घेतली होती. त्यानं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता.