"...म्हणून मी ब्रह्मास्त्रमधील भूमिका नाकारली", ट्रोलिंगनंतर सिद्धांतने स्पष्टच सांगितलं, म्हणतो - मला कास्टिंग टीमकडून...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:40 PM2024-03-09T13:40:38+5:302024-03-09T13:42:29+5:30
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र भाग-१' या चित्रपटाला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली.
Siddhant Chautrvedi : अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र भाग-१' या चित्रपटाला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली. जवळपास ५ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या सिनेमाच्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळाला. चित्रपटाचा पाहिला भाग हिट ठरल्यानंतर आता चाहत्यांना पार्ट - २ ची उत्सुकता आहे. याच दरम्यान 'गल्ली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं यावर भाष्य केलंय.
अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र : भाग १- शिवा’ चित्रपट नाकारल्याने सिद्धांतला ट्रोलींगचा सामना करावा लागला होता. त्याबद्दल अभिनेत्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धांतने 'ब्रम्हास्त्र : भाग १' चित्रपटाच्या ऑफरविषयी बातचीत केली. या सिनेमाची स्क्रिप्ट तयार नव्हती किंवा ऑडिशन्सही घेतल्या गेल्या नव्हत्या. त्यांनी मला विचारलं तू मार्शल आर्ट करतोस? ही एक ॲक्शन फिल्म होती, त्यात मला सुपरहिरोची भूमिका मिळणार होती, असं देखील सिद्धांत म्हणाला. शिवाय हा एक VFX प्रोजेक्ट आहे आणि त्याला बनवायला पाच वर्षे लागतील, अशी माहिती दिग्दर्शकाने त्याला दिली होती.
अभिनेत्याने सांगितले की, त्याने दिग्दर्शक अयान मुखर्जीला एक स्क्रिप्ट देण्यास सांगितले होते. जेणेकरून त्याला या चित्रपटातील त्याची भूमिका समजू शकेल. तथापि, हे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होतं. अभिनेता म्हणाला, 'काय करावं हे मला समजत नव्हतं आणि त्या भूमिकेसाठी ऑडिशनसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.' मात्र, मी ही भूमिका नाकारली.
त्याचबरोबर चित्रपट नाकारल्यानं सिद्धांतला मोठ्या प्रमाणात ट्रोलींगचा सामना कारावा लागला. मी कास्टिंग दिग्दर्शकाला स्पष्ट सांगितलं की, मी हा चित्रपट करू शकत नाही. तेव्हा मला कास्टिंग टीमकडून ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. मी कास्टिंग सर्किटमध्ये बदनाम झालो होतो. वेडा आहे हा मुलगा, सिलेक्ट होऊनही नंतर चित्रपट नाकारतो, असं माझ्याबद्दल म्हटलं गेलं. सुदैवानं हा चित्रपट तयार व्हायला खूप वेळ लागला. तोपर्यंत ‘गल्ली बॉय’ चित्रपट मला मिळाला होता, असं देखील अभिनेता म्हणाला.