गेल्या १४ वर्षांपासून रात्री उपाशी झोपतात मनोज वाजपेयी; आजोबांमुळे घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 06:00 PM2023-05-11T18:00:12+5:302023-05-11T18:00:46+5:30
Manoj bajpayee: कित्येक वर्षांपासून मनोज वाजपेयी रात्रीचं जेवण जेवले नाहीत.
हिंदी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी (manoj bajpayee). दर्जेदार अभिनयामुळे चर्चेत येणारा मनोज वाजपेयी यावेळी त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. विशेष म्हणजे मनोज वाजपेयी गेल्या १३-१४ वर्षांपासून केवळ एकच वेळ जेवतो. आणि, असं करण्यामागचं कारणही त्याने सांगितलं.
मनोज वाजपेयी सध्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या प्रोजेक्टमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने कर्ली टेल्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.
"गेली १३-१४ वर्ष झाली मी रात्री जेवलोच नाही. माझे आजोबा खूप बारीक होते पण तितकेच फीट सुद्धा. म्हणून ते जे फॉलो करायचे तेच आपण सुद्धा फॉलो करुन पाहुयात असं मी ठरवलं.त्यानुसार मी करायला सुरुवात केली. त्यामुळे माझं वजन नियंत्रणात राहू लागलं. माझा उत्साह वाढला, निरोगी वाटू लागलं. त्यामुळे मी पुढेही याच गोष्टीचं पालन करायचं ठरवलं",असं मनोज वाजपेयीने सांगितलं.
पुढे ते म्हणतात, "सुरुवातीला असं करणं फार कठीण गेलं मग मी उपवास करु लागलो. सुरुवातीला १२ तास, कधी १४ तास असं करत करत मी रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद केलं. रात्रीचं जेवण झाल्यानंतर आमच्या स्वयंपाकघरात काहीही शिजत नाही.फक्त माझी मुलगी हॉस्टेलवरुन घरी आल्यावरच काही तरी पदार्थ केले जातात. सुरुवातीला मला खूप भूक लागायची. त्यामुळे मी भरपूर पाणी प्यायचो आणि बिस्किट खायचो. पण, आता सवय झाली."
दरम्यान, मनोज वाजपेयी हे हेल्दी डाएट फॉलो करत असल्यामुळे त्यांना कोणत्याही शारीरिक समस्या नाहीत. लवकरच ते 'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमात ते वकिलाची भूमिका साकारत आहेत.