"लव्ह मॅरेजमुळे सासूबाई आजही नाराज"; लग्नाच्या २० वर्षानंतर पंकज त्रिपाठींच्या पत्नीने व्यक्त केली खंत, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:19 AM2024-10-25T10:19:07+5:302024-10-25T10:23:01+5:30
मिर्झापूर’ फेम अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Pankaj Tripathi : ‘मिर्झापूर’ फेम अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्यांनी हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सिनेमा वा ओटीटी, माध्यम कोणतेही असो; पंकज त्रिपाठींच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात झालं आहे.परंतु त्यांना वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. याबाबत पंकज त्रिपाठींच्या पत्नीने खुलासा केला आहे. मृदुला त्रिपाठी (Mridula tripathi) यांचा पंकज यांच्या घराच्यांनी सून म्हणून स्विकार करण्यास नकार दिला होता. लव्ह मॅरेज केल्यामुळे प्रत्येकजण त्यांच्यावर नाराज झाला. अखेरीस घरच्यांना त्यांचं नात मान्य करावं लागलं. याचा खुलासा मृदुला त्रिपाठी यांनी एका मुलाखतीत केला.
नुकतीच पंकज त्रिपाठी यांच्या पत्नी मृदुला यांनी अतुल शेटे यांच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "पंकज आणि माझी पहिली भेट त्यांच्या बहिणीच्या लग्नामध्ये झाली. त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढू लागल्या. मी त्यावेळी ९वी मध्ये होते तर पंकज ११ वीत शिकत होते. परंतु या गोष्टी आमच्या कुटुबांतील कोणालाही माहित नव्हत्या. बऱ्याच दिवसानंतर माझ्या आईला आमच्या नात्याबद्दल कळलं. त्यानंतर माझ्यावर काही बंधन लादण्यात आली. तिने मला पंकजला भैया म्हणून हाक मारण्यास सांगितलं. पण, मला भैया बोलण अवघड वाटायचं म्हणून मी त्यांना पंकजजी अशी हाक मारू लागले".
पुढे मृदुला यांनी सांगितलं, "आमचं नात्यामुळे घरी खूपच वाद निर्माण झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी अद्यापही माझा सून म्हणून स्विकार केलेला नाही. कोणत्याही मोठ्या घरातील मुलगी छोट्या घरात लग्न करू शकत नाही. समाजात अजूनही त्या विचारधारेचे लोक आहेत. असं असतानाही मी आमच्या नात्याबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं. परंतु त्यांनी आमच्या लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर वडिलांनी पंकजला घरी बोलावलं. माझ्या आईलाही याची कल्पना दिली गेली. यानंतर घरचं वातावरण पूर्णपणे बिघडलं. सगळेच माझ्यावर नाराज झाले. पंकज माझा सांभाळ कसा करेल का? याची चिंता त्यांना सतावत होती. कालांतराने माझ्या घरच्यांनी पंकज यांनी स्विकारलं. पण, आजही माझ्या सासूबाईंची नाराजी कायम आहे. त्यांनी मला अजूनही त्रिपाठी कुटुंबाची एक सदस्य म्हणून मानलेलं नाही".