पत्रकार ते व्हिलन; 'कर्नल चिकारा' बनून प्रेक्षकांना धडकी भरवणारा हा अभिनेता आठवतोय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 03:04 PM2024-08-07T15:04:02+5:302024-08-07T15:08:34+5:30
हिंदी सिनेसृष्टीत असे काही कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
Rami Reddi Film Industry Journey: हिंदी सिनेसृष्टीत असे काही कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. खरं तर सिनेमे हे कोणत्याही व्हिलनशिवाय पूर्ण होत नाहीत, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. ९० च्या दशकामध्ये अमरीश पुरी, प्राण तसेच प्रेम चोप्रा यांसारख्या अभिनेत्यांनी चित्रपटांमध्ये खलनायिकी भूमिका साकारून ते लोकप्रिय झाले. अशातच त्यावेळी सिनेसृष्टीत एका साऊथच्या अभिनेत्याचा बोलबाला होता.
चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तो व्हिलन म्हणजे रामी रेड्डी. ' कर्नल चिकारा' असो किंवा 'स्पॉट नाना' त्यांनी साकारलेल्या या भूमिका त्याकाळी विशेष गाजल्या. रामी रेड्डी यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत.
जन्म-
रामी रेड्डी यांचा जन्म १ जानेवारी १९५९ मध्ये आंध्रप्रदेश येथे झाला. त्याचं पूर्ण नाव गंगासानी रामी रेड्डी असं होतं. १९८९ मध्ये तेलुगू चित्रपटांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
सिनेजगतात आज या अभिनेत्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. पण, सुरुवातीला रामी रेड्डी यांना अभिनयात फारशी रुची नव्हती, असं सांगितलं जातं.
हैदराबाद येथील उस्मानिया यूनिव्हर्सिटीमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर रामी रेड्डी यांनी एका वृत्तसंस्थेत कामही केलं. शिवाय या माध्यमातून त्यांना बऱ्याच सिने-कलाकारांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली.
सिनेकारकिर्द-
१०८९ मध्ये रामी रेड्डी यांनी 'अनुकुसुम' या तेलुगू सिनेमातून इंड्स्ट्रीत पाऊल ठेवलं. या पहिल्याच चित्रपटात त्यांनी केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं.
रामी रेड्डी यांनी साकारलेल्या 'कर्नल चिकारा', 'स्पॉट अन्ना', 'रघु शेट्टी', 'विठ्ठल राव' यांसारख्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. १९९० मध्ये 'प्रतिबंध' सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 'खुद्दार', 'गुंडा', 'वक्त हमारा है', 'शपथ', 'ऐलान', 'दिलवाले' 'अंगरक्षक', 'हकीकत' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
रेड्डींना त्यांच्या बॉलिवूड सिनेमातील खलनायकाच्या भूमिकांमुळे लोकप्रियता मिळाली. जवळपास २५० पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत. पण अखेर नशीबाचे फासे फिरले. लिव्हर आणि किडणीच्या आजारामुळे त्यांची प्रकृती बिघडली. लिव्हर कॅन्सरसारख्या आजाराने ते ग्रासले. अखेर १४ एप्रिल २०११ ला सिकंदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं.