'स्टुडंट ऑफ द इयर' साठी नाकारली हॉलिवूडची ऑफर; बॉलिवूड अभिनेत्याला आजही होतोय पश्चाताप, म्हणतो' ऑस्कर विजेत्या...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 17:31 IST2024-10-11T17:28:14+5:302024-10-11T17:31:52+5:30
टीव्ही अभिनेता रोनित रॉयने मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'स्टुडंट ऑफ द इयर' साठी नाकारली हॉलिवूडची ऑफर; बॉलिवूड अभिनेत्याला आजही होतोय पश्चाताप, म्हणतो' ऑस्कर विजेत्या...'
Ronit Roy : टीव्ही अभिनेता रोनित रॉयने मनोरंजनविश्वात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'कसोटी जिंदगी की' मालिकेमुळे अभिनेत्याला अनेक जण ओळखतात. रोनितने छोट्या पडद्यावरील वेगवेगळ्या मालिका तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं. अभिनेत्याचा सिनेसृष्टीतील प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल...
रोनित रॉय त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचा अभिनय पाहून ऑस्कर विजेते दिग्दर्शक 'Kathryn Bigelow' यांनी त्याला हॉलिवूड चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. 'झिरो डार्क थर्टी' या चित्रपटात काम करण्याची अभिनेत्याला ऑफर आली होती. याचा खुलासा रोनितने 'द कपिल शर्मा' शोमध्ये केला होता. एका बॉलिवूड चित्रपटासाठी त्याने ही संधी नाकारली. या निर्णयाचा आजही पश्चाताप होत असल्याची कबुली त्याने दिली.
गतवर्षी प्रदर्शित झालेल्या 'शहजादा' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन, क्रिती सनॉन शिवाय राजपाल यादव यांसारखे कलाकार शोमध्ये उपस्थित होते. या शोमध्ये अभिनेता म्हणाला, "हॉलिवूड चित्रपट झिरो डार्क थर्टी साठी कोणतंही ऑडिशन न देता मला सिलेक्ट करण्यात आलं होतं. एका ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाने माझी यासाठी निवड केली हे पाहून मला स्वत ला सगळं स्वप्नवत वाटलं. मी 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मी ही संधी नाकारली. कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता".