दिलदार सुपरहिरो! मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला अभिनेता सोनू सूद करणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:17 PM2023-09-12T12:17:56+5:302023-09-12T12:27:12+5:30
राजाने हार मानली नाही आणि जून 2023 मध्ये हजारीबागहून मुंबईला स्कूटरवर निघून सोनू सूदची भेट घेतली.
कोरोना लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूदने अडचणीत सापडलेल्या अनेकांना मदत केली. तेव्हापासून त्याला गरिबांचा मसिहा म्हटलं जाऊ लागलं. मदतीच्या आशेने लोक दूर वरून त्याच्याकडे जातात. याच दरम्यान हजारीबागच्या हबीबीनगर येथील राजा नावाच्या व्यक्तीने आपल्या मोठ्या भावाच्या आजारपणात मदतीसाठी सोनू सूदकडे संपर्क साधला होता. सोनू सूदने त्याची भेट घेऊन मदतीचे आश्वासनही दिले आहे.
हजारीबाग येथील हबीबीनगर येथील मोहम्मद शोएब आलम यांचा मोठा मुलगा युसूफ याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. युसूफ सध्या डायलिसिसवर आहे. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सतत डायलिसिस करून घेता यावे, यासाठी युसूफचा धाकटा भाऊ राजा हा सोनू सूदची मदत घेण्यासाठी हजारीबाग येथून स्कूटरवरून मुंबईला गेला. युसूफचे वडील मोहम्मद शोएब आलम हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहेत.
मोहम्मद युसूफवर सध्या रांचीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. युसूफचा धाकटा भाऊ राजा याने सांगितले की, 2021 मध्ये त्याचा मोठा भाऊ युसूफची एक किडनी निकामी झाली होती. काही दिवसांनी दोन्ही किडन्या खराब झाल्या. यासाठी तो सतत सोनू सूदची मदत घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. राजा पुढे सांगतो की तो सोनू सूदला एकदा 2022 मध्ये भेटायला गेला होता पण त्याला भेटता आले नाही.
राजाने हार मानली नाही आणि जून 2023 मध्ये हजारीबागहून मुंबईला स्कूटरवर निघून सोनू सूदची भेट घेतली. राजा पुढे म्हणतो की त्याचा भाऊ अजूनही जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान आहे. त्याची प्रकृती लक्षात घेऊन सोनू सूदने त्याच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे. सोनू सूदने सांगितले की, युसूफला एकदा बी पॉझिटिव्ह किडनी डोनर मिळाला की, उपचारासाठी जो काही खर्च येईल तो सोनू सूद उचलेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.