'बॉर्डर' मधील 'तो' सीन करताना सनी देओलला अश्रू अनावर; असं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 04:59 PM2024-10-04T16:59:24+5:302024-10-04T17:02:39+5:30
सध्या मनोरंजनविश्वात अभिनेता सनी देओलच्या आगामी 'बॉर्डर-२' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
Sunny Deol Border -2 : १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला. देशभक्तीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन जेपी दत्त यांनी केलं होतं. यामध्ये सनी देओल, जॅकी श्रॉफ तसेच सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. आता जवळपास २७ वर्षानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली. 'गदर-२' च्या यशानंतर सनी देओल आता या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये काही नवीन चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत. वरूण धवन, दिलजीत दोसांझ तसेच अहान शेट्टी या अभिनेत्यांची चित्रपटात वर्णी लागली आहे. परंतु, 'बॉर्डर' या सिनेमातून एक सीन कट करण्यात आला होता. जो सीन वाचताच अभिनेता भावुक होत असे. याचा खुलासा सनी देओलने एका मुलाखतीत केला.
नुकतीच अभिनेता सनी देओलने रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने 'बॉर्डर' चित्रपटातील शूटिंग दरम्यानचे किस्से सांगितले. दरम्यान मुलाखतीत अभिनेत्याला 'बॉर्डर'मधील आवडता सीन कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "चित्रपटात एक सीन होता, जो सीन कट करण्यात आला. मी चित्रपटाच्या शेवटी एक मंदिर असलेल्या ठिकाणी जातो. जिथे पाठीमागे लाइट दिसते. मागे वळून पाहतो तर सगळं होत्याचं नव्हतं झालेलं असतं. शिवाय त्या ठिकाणी आगही लागलेली असते. मी तिथे जाऊन पाहतो तर सगळे सैनिक गोळी लागल्यामुळे जमिनीवर धारातीर्थ पडलेले असतात".
पुढे अभिनेत्याने म्हटलं, "त्यांना पाहून मी पुढे जातो आणि म्हणतो तुम्ही काळजी करू नको मी तुझ्या घरी जाऊन सगळं घरातं दुरुस्तीचं काम करून आलोय. तसंच मी त्यांना म्हणतो, तुम्ही जिथे गेला आहात तिथे कोणीतंही युद्ध होणार नाही. तो सीन जेव्हा करायचो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी यायचं".
सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी तो सीन पुन्हा पाहता यावा यासाठी मागणी केली आहे.