हातात पंखा अन् नजरेत आग! वाढदिवशी सनी देओलचं चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटातून येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:36 IST2024-10-19T13:29:39+5:302024-10-19T13:36:41+5:30
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज ६७ वा वाढदिवस साजरा करतो आहे. दरम्यान अभिनेत्याने वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे.

हातात पंखा अन् नजरेत आग! वाढदिवशी सनी देओलचं चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटातून येणार भेटीला
Sunny Deol: " ये ढाई किलो का हात..." हा डायलॉग कानावर पडताच अभिनेता सनी देओलचे( Sunny Deol) अॅक्शन सीन्स डोळ्यासमोर उभे राहतात. बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सनी देओल याचा आज ६७ वा वाढदिवस आहे. सनी देओलने गदर, घायल आणि बॉर्डरसारख्या चित्रपटातील दमदार भूमिकेतून बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे. अशातच वाढदिवसाच्या प्रसंगी सनी देओलने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. लवकरच अभिनेता नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सनी देओलने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने नवीन चित्रपटाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्याने त्याच्या आगामी सिनेमाची पोस्टर इमेज शेअर केली आहे. 'जाट' असं त्याच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. गोपीचंद मलिनेनी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.हातात पंखा, नजरेत अंगार अशा लूकमध्ये सनी देओल दिसतोय. गोपीचंद मलिनेनी यांच्या या ॲक्शनपट चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
या चित्रपटाची निर्मिती माइथ्री मूवी मेकर्स तसेच पीपल मीडिया फॅक्ट्री करणार आहेत. जाट अॅक्शनपट चित्रपटातील पोस्टरमध्ये सनी देओलचा दमदार लूक पाहायला मिळतो आहे. रणदीप होड्डा, विनीत कुमार सिंह, रेजिना कैसंड्रा तसेच संयमी खेर यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.