अभिनेते टीकू तलसानिया यांना ब्रेनस्ट्रोक, आता कशी आहे तब्येत? लेक शिखाने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 10:18 IST2025-01-13T10:16:05+5:302025-01-13T10:18:11+5:30
सुप्रसिद्ध कॉमेडियन टीकू तलसानिया यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे.

अभिनेते टीकू तलसानिया यांना ब्रेनस्ट्रोक, आता कशी आहे तब्येत? लेक शिखाने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली...
Tiku Talsania Health Update: सुप्रसिद्ध कॉमेडियन टीकू तलसानिया (Tiku Talsania) यांना शनिवारी ११ जानेवारी २०२५ या दिवशी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता टीकू तलसानियाच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात त्यांची मुलगी शिखा तलसानियाने सोशल मीडियाद्वारे हेल्थ अपडेट दिली आहे.
शिखाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे वडीलांच्या प्रकृतीबद्दल माहिती देत चाहत्यांचे देखील आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये शिखा तलसानियाने लिहिलंय की, "तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेसाठी मनापासून धन्यवाद! आम्हा सर्वासाठी हा भावनिक काळ होता, पण, मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की माझ्या वडीलांची तब्बेतीमध्ये पूर्वीपेक्षा सुधारणा दिसते आहे आणि ते या सगळ्यातून सावरत आहेत."
पुढे तिने म्हटलंय,"आम्ही कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत कारण त्यांनी चांगल्या पद्धतीने उपचार केले. त्यासोबत चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे देखील ऋणी आहोत."
वर्कफ्रंट
टीकू यांना आपण 'सर्कस', 'स्पेशल २६', 'फिर हेरा फेरी', 'हंगामा', 'रिश्ते', 'देवदास' अशा सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. टीकू यांचा जन्म १९५४ साली झाला. त्यांनी १९८४ साली टेलिव्हिजनवर आलेल्या 'ये जो है जिंदगी' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे अनेक मालिका, सिनेमांमधून त्यांनी कॉमिक रोल्स साकारले. याशिवाय गुजराती रंगभूमीवरही त्यांनी काम केलंय. त्यांच्या पत्नीचं नाव दीप्ती असून त्यांना रोहन आणि शिखा ही दोन मुलं आहेत. त्यापैकी शिखा ही अभिनेत्री असून तिने 'वेक अप सिड', 'वीरे दी वेडिंग' अशा सिनेमांमध्ये काम केलंय. याशिवाय 'शांतीत क्रांती' या मराठी वेबसीरिजमध्येही शिखा झळकली होती. टीकू तलसानिया लवकरात लवकर बरे व्हावेत अशी त्यांच्या चाहत्यांना आशा आहे.