समय रैनाच्या शोसाठी 'या' अभिनेत्याचा होता नकार, Beer Biceps च्याच मुलाखतीत केलेला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:46 IST2025-02-12T16:45:49+5:302025-02-12T16:46:55+5:30
रणवीर अलाहाबादियाच्याच पॉडकास्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्याने समय रैनाच्या शोला नकार दिल्याचा खुलासा केला. म्हणाला, 'निगेटिव्ह पब्लिसिटी नको...'

समय रैनाच्या शोसाठी 'या' अभिनेत्याचा होता नकार, Beer Biceps च्याच मुलाखतीत केलेला खुलासा
कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये आक्षेपार्ह जोक केल्याने प्रसिद्ध यु्ट्युबर रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला. पालकांबाबतीत रणवीरने केलेला प्रश्न खूपच विकृत होता. त्याच्या या जोकमुळे वातावरण चांगलंच तापलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. शिवाय तो एपिसोडही युट्युबवरुन हटवण्यात आला. समय आणि रणवीरसारख्या या लोकांवर अनेकांन टीका टिप्पणी केली आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याला समय रैनाने शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र निगेटिव्ह पब्लिसिटी होईल या भीतीने त्याने नकार दिला होता. कोण आहे तो अभिनेता?
हा अभिनेता आहे वरुण धवन. तो नुकताच 'बेबी जॉन' सिनेमात दिसला. याच सिनेमाच्य प्रमोशननिमित्त तो अनेक ठिकाणी मुलाखती देत होता. तेव्हाच त्याने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्येही हजेरी लावली. यावेळी रणवीरने समय रैनाचा विषय काढला. यावर वरुण म्हणाला, "समयने मला शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला तर शोमध्ये जायचं होतं. पण मला वाटलं की याचा निगेटिव्ह परिणामही होऊ शकतो. जर तुम्ही अशा प्रकारच्या कॉमेडी शोमध्ये सहभागी होता तर कधी कधी वाद होऊ शकतो. तो घाबरत नाही ही गोष्ट वेगळी."
वरुण पुढे म्हणाला, "सध्या मी ज्या टीमसोबत आहे, सिनेमाचं प्रमोशन करत आहे अशा परिस्थितीत मला त्या शोमध्ये जाणं बरोबर वाटलं नाही. पण जेव्हा मी प्रमोशन करत नसेल तेव्हा मी त्या शोमध्ये जाईन. कारण मी आता शोमध्ये गेलो तर नक्कीच माझ्यावर प्रश्नांचा भडिमार होईल, याची मला खात्री आहे. "
सध्या समय रैना, रणवीर अलाहाबादियासह त्या दिवशी शोमध्ये उपस्थित सर्व कॉमेडियनची चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी अनेकजण करत आहेत. दरम्यान रणवीर अलाहाबादियाने जाहीर माफी मागितली आहे. तरी आता त्याला ही चूक किती महागात पडू शकते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.