"ही पीआर स्ट्रॅटेजी असावी..." विक्रांत मेस्सीच्या निवृत्तीच्या घोषणेवर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:34 AM2024-12-03T10:34:18+5:302024-12-03T10:38:00+5:30
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
Vikrant Massey:बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने (VikrantMassey) '१२ वी फेल' तसेच 'सेक्टर-३६' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं. सध्या अभिनेता चर्चेचं कारण ठरला आहे. विक्रांतने अचानक अभिनयातून निवृत्ती घेत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्काच बसला आहे. करिअरमध्ये यशाचं शिखारावर असताना त्याने अचानक असा निर्णय का घेतला या प्रश्नाचं उत्तर अद्यापही उनुत्तरित आहे. विक्रांत मेस्सीने केलेल्या घोषणेमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. त्यातच आता 'हसीन दिलरुबा' या चित्रपटातील त्याचा सहकलाकार हर्षवर्धन राणेने (Harshvardhan Rane) देखील यावर प्रतिक्रिया देताना ही ‘पीआर स्ट्रॅटेजी’ असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.
नुकतीच हर्षवर्धन राणेने 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने विक्रांत मेस्सीच्या अभिनयातून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान, हर्षवर्धन म्हणाला, "ही केवळ एक पीआर स्ट्रॅटेजी असावी, मला आशा आहे की विक्रांत सुद्धा बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान यांच्याप्रमाणे पुन्हा सिनेमात काम करताना दिसेल. त्यांनी सुद्धा इंडस्ट्रीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला होता."
पुढे हर्षवर्धन म्हणाला, "विक्रांत हा शांत आणि स्पष्ट विचारसरणीचा माणूस आहे. मला त्याचं काम आणि काम करण्याच्या पद्धतीचं नेहमीच कौतुक वाटतं. मी देवाकडे अशी प्रार्थना करतो की विक्रांतने केलेली निवृत्तीची घोषणा हा फक्त एखाद्या सिनेमासाठी त्याच्यावर निर्मात्याने लादलेला पीआर स्टंट असावा."
अलिकडेच विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने केलेलं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.