"अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन...", विवेक ओबेरॉयने सांगितला वाईट अनुभव; म्हणाला- "माझ्या कुटुंबीयांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:42 IST2024-12-07T12:39:57+5:302024-12-07T12:42:19+5:30
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला.

"अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन...", विवेक ओबेरॉयने सांगितला वाईट अनुभव; म्हणाला- "माझ्या कुटुंबीयांना..."
Vivek Oberoi:बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला. 'मस्ती', 'साथिया' यांसारख्या चित्रपटांमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनात आपली वेगळीच जागा निर्माण केली. सध्या अभिनेता मनोरंजन विश्वापासून काहीसा दूर आहे. परंतु त्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. आजही त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अभिनेत्याबद्दल जाणून घेण्यास त्याचे चाहते कायमच उत्सुक असतात. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या संघर्षकाळावर भाष्य केलं आहे.
नुकतीच विवेक ओबेरॉयने डॉक्टर जय मदन यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, "एक वेळ अशी होती जेव्हा मी माझ्या करिअरमध्ये संघर्ष केला. त्यावेळी मला आर्थिक ताण देखील सहन करावा लागला. तेव्हा मी प्रचंड तणावात असायचो. मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे. मी माझ्या आयुष्यात असं कधी अनुभवलं नव्हतं. हे सगळं फार विचित्र होतं."
पुढे अभिनेत्याने या मुलाखतीत सलमान खानसोबतच्या वादावर भाष्य केलं. त्यादरम्यान विवेक ओबेरॉय म्हणाला, "तो एक भावनिक प्रतिसाद होता. त्यावेळेस मी केलेल्या त्या कृतीचे काय परिणाम झाले ते मला आज कळतंय. मी तेव्हा जे काही केलं त्याला सामोरा जाण्यासाठी माझी तयारी होती. पण, जेव्हा माझ्या कुटुंबीयांना धमकीचे फोन येऊ लागले त्याचा मला त्रास होऊ लागला. माझ्या आई-वडिलांनी एखादा फोन उचलला तर त्यांनी थेट समोरून धमकी दिली जायची. मला माझ्या बहिणींसाठी भीती वाटायची. सुरुवातीला आम्हाला वाटलं की हे प्रॅंक कॉल आहेत पण नंतर पोलिसांनी या धमक्या खऱ्या असल्याचं सांगितलं." असा खुलासा अभिनेत्याने केला.