'दिवसातून ३-४ वेळा व्हिडिओ कॉल, कधीकधी तो रात्री...'; जॅकलिनचा सुकेशविरोधात धक्कादायक जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:33 PM2023-01-19T13:33:33+5:302023-01-19T13:33:41+5:30
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखर विरोधात कोर्टात जबाब नोंदवला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे २०० कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. नुकतेच जॅकलीनने गँगस्टर सुकेश चंद्रशेखर विरोधात पतियाळा कोर्टात तिचा जबाब नोंदवला आहे. यावेळी सुकेशने तिच्या भावनांशी खेळून तिचं करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप जॅकलिन फर्नांडिसने केला आहे.
जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणात पटियाला कोर्टात हजर झाली होती. यावेळी तिने आपले म्हणणे न्यायालयासमोर ठेवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनने दावा केला आहे की, सुकेश चंद्रशेखर हे सरकारी अधिकारी असल्याची माहिती होती. पिंकी इराणीने मेकअप आर्टिस्ट शान मुथाथिलला पटवून दिले की, तो गृह मंत्रालयातील अधिकारी आहे. याशिवाय सुकेशने स्वत:ला सन टीव्हीचे मालक आणि जयललिता त्याची मावशी असल्याचे सांगितले होते.
जॅकलीन म्हणाली की, सुकेश म्हणाला होता की, तो माझा खूप मोठा चाहता आहे आणि माझ्यासोबत दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मी आणि सुकेश दिवसातून किमान तीन ते चार वेळा फोन आणि व्हिडिओ कॉलवर बोलायचे. माझ्या शूटिंगला जाण्यापूर्वी तो कधीकधी रात्री फोन करायचा. पण तो तुरुंगातून बोलतो हे मला माहीत नव्हते. कुठल्यातरी कोपऱ्यातून तो फोन करायचा. त्याच्या सोफा आणि पडदाही दिसत होता, असा दावा जॅकलीनने केला आहे.
सुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी कळल्यानंतरही पिंकीने काहीही सांगितले नाही, असेही जॅकलिनने सांगितले. सुकेशने आपले नाव शेखर असे सांगितले. शेखरने मला फसवले. सुकेशशी तिचे शेवटचे बोलणे ८ ऑगस्ट २०२१ रोजी कॉलवर झाले होते. त्यानंतर त्याने माझ्याशी संपर्क साधला नाही. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी मला नंतर कळली, असं जॅकलीनने म्हटलं आहे. आता या प्रकरणात न्यायलय नेमका काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
जॅकलिनसोबतच्या नात्यावर सुकेशचा खुलासा
काही दिवसांपूर्वी सुकेशने तुरुंगातून त्याच्या वकिलासाठी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने जॅकलिन निर्दोष असल्याचं म्हटलं होतं. ‘या प्रकरणात जॅकलिनला आरोपी बनवणं दुर्दैवी आहे. आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्याच नात्याने मी जॅकलिन आणि तिच्या कुटुंबीयांना भेटवस्तू दिले होते. यात जॅकलिनचा काय दोष? जॅकलिनने माझ्याकडून कधीच काही मागितलं नाही. मी तिच्यावर प्रेम करावं आणि नेहमी तिच्यासोबत राहावं, एवढीच तिची अपेक्षा होती. मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून तिला भेटवस्तू दिल्या होत्या. कोर्टासमोर मी या सर्व गोष्टी सिद्ध करेन, असंही त्याने म्हटलं होतं.
नेमकं काय आहे प्रकरण?
२०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरवर दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १७ ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये २०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता. सुकेशवर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याच पैशातून त्याने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. जॅकलिन फर्नांडिला देखील त्याने अनेक महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. सुकेश चंद्रशेखरने ५ जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल ५२ लाख रुपए होती. तर प्रत्येकी ९ लाख रुपये किंमत असलेली ३६ लाख रूपयांची ४ पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"