'...तर मी देखील तेच करेल, जे त्याने केलं'; अभिनेत्री कंगना रणौतचा विल स्मिथला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 10:51 AM2022-03-29T10:51:40+5:302022-03-29T10:52:01+5:30
आता बॉलिवडूची अभिनेत्री कंगना रणौतने देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
जगभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांसाठी ऑस्करचा पुरस्कार सोहळा म्हणजे पर्वणी असतो. सोहळ्याचा सूत्रसंचालक कधी शाब्दिक कोट्या करत तर कधी विनोदी कोपरखळ्या मारत सोहळ्याचे वातावरण हलकेफुलके ठेवतो. मात्र, सोमवारी झालेला पुरस्कार सोहळा या सगळ्याला अपवाद ठरला.
प्रख्यात अभिनेता विल स्मिथ याने थेट रंगमंचावर जाऊन सूत्रसंचालकाची भूमिका वठवत असलेला विनोदवीर ख्रिस रॉक याच्या श्रीमुखात लगावली अन् जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक अवाक् झाले. पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने संतापाच्या भरात विलने ही कृती केली. सदर घटनेवर अनेक जणांनी आपली भूमिका मांडली. त्यातच आता बॉलिवडूची अभिनेत्री कंगना रणौतने देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
कंगना रणौत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली की, ''जर एक मूर्ख माणूस लोकांना हसवण्यासाठी जर माझ्या आई किंवा बहिणीबद्दल कोणी अशी चेष्टा करत असेल तर मी देखील तेच करेल, जे स्मिथनं केलं.''
दरम्यान, विल स्मिथची पत्नी जेदा पिंकेट गेल्या काही वर्षांपासून एका व्याधीने ग्रस्त आहे. या व्याधीत तिचे डोक्यावरील केस गळत असल्याने तिने पूर्णत: टक्कल केले आहे. हाच धागा पकडून ख्रिस रॉक याने बोलण्याच्या ओघात जेदा पिंकेटवर टिप्पणी करत ९०च्या दशकात गाजलेल्या ‘जीआय जेन’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेचा उल्लेख केला.
‘जीआय जेन२’ हा चित्रपट आला तर त्याची नायिका जेदा हीच असेल, असे ख्रिस म्हणाला. पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संतापलेल्या विलने थेट रंगमंचावर धाव घेत ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. हा प्रकार एवढा झटपट घडला की उपस्थित प्रेक्षकही स्मिथच्या या कृतीने अवाक् झाले. जागेवर परतल्यानंतरही स्मिथने अर्वाच्य भाषेत ख्रिस रॉकला समज दिली.
दोघांनीही मागितली माफी-
‘किंग रिचर्ड’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल ऑस्कर मिळाल्यानंतर भावूक झालेल्या विल स्मिथने आपल्या हातून घडलेल्या प्रमादाबद्दल माफी मागितली. ख्रिस रॉकनेही आपण पुन्हा असे बोलणार नाही, असे सांगत स्मिथची माफी मागितली.