नशेच्या आहारी गेल्या होत्या रेखा, दारू आणि ड्रग्ज घेतल्याचा स्वत:च केलेला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:10 PM2024-07-10T16:10:17+5:302024-07-10T16:14:48+5:30
अभिनेत्री रेखा यांच नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
Rekha Painful Story : अभिनेत्री रेखा यांच नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. जगभरात एक एव्हरग्रीन अभिनेत्री अशी त्यांची ख्याती आहे. १९७० मध्ये आलेल्या 'सावन भादों' या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर 'खूबसूरत', 'उमराव जान', 'मुकद्दर का सिकंदर' असे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यांने त्यांनी चाहत्यांना वेड लावलं. आजही प्रेक्षक त्यांच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसतात.
पण हिंदी मनोरंजन विश्वात ही अभिनेत्री तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक गोष्टींमुळे जास्त चर्चेत आली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यावेळेस इंडस्ट्रीत त्यांच्या लव्हलाईफबद्दल चांगलीच चर्चा रंगली. विनोद मेहरा तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच नाव जोडलं गेलं. पण रेखा यांनी या अफवांचं कायमच खंडन केलं.
अभिनेत्री रेखा यांची सिमी गरेवाल यांनी एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील अज्ञात बाजूवर प्रकाश टाकला. शिवाय सिमि यांनी घेतलेल्या मुलाखतीत रेखा यांनी अनेक खुलासे केले होते. या शोमध्ये सिमी गरेवाल त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारते. 'टाईम्स नाऊ' च्या वृत्तानुसार, ज्या क्षणी सिमी रेखा यांना त्यांच्या मद्यपानाच्या सवयींबद्दल प्रश्न विचारते त्यावर त्या म्हणतात, "हे खरं आहे मी खूप जास्त दारू प्यायचे आणि मी अंमली पदार्थांचे सेवन देखील करायचे. परंतु मी असं का केलं? याबाबत मला कोणी विचारलं का? जीवनात मला काय मिळालं काय नाही? याविषयी कोणालाच माहिती नाही".
यापुढे सिमी विचारते, एका विवाहित पुरुषावर तुम्ही प्रेम केलंत याबद्दल काय सांगाल? त्यावर अभिनेत्री म्हणते," मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं, परंतु मी कोणाचाही संसार उद्धवस्त करून आयुष्यात कधीच सुखी राहिले नसते. त्यासाठी मी कधीच त्यांच्याकडे माझा अधिकार मागितला नाही आणि मी कायमच त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करते".