श्रीदेवी यांचा नकार अन् माधुरीच्या पदरी पडला 'हा' सुपरहिट सिनेमा; मिळाली 'धकधक गर्ल' ही ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:05 IST2024-12-20T11:00:38+5:302024-12-20T11:05:18+5:30
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या ऑनस्क्रीन जोडीला कायमच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

श्रीदेवी यांचा नकार अन् माधुरीच्या पदरी पडला 'हा' सुपरहिट सिनेमा; मिळाली 'धकधक गर्ल' ही ओळख
Beta Movie: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या ऑनस्क्रीन जोडीला कायमच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यांची केमिस्ट्री सिनेरसिकांना फार आवडायची. साल १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बेटा' या चित्रपटातील अनिल कपूर आणि माधूरी दीक्षितच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं. माधुरीची सिनेकारकिर्द फारच मोठी आहे. माधुरी दीक्षितला आज ही लोक 'धकधक गर्ल' या नावानेच ओळखतात. प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या 'बेटा' या सिनेमातील 'धक धक करने लगा' या गाण्यामुळे तिला हे नाव मिळालं, असं सांगण्यात येतं. या गाण्यामुळे माधुरीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. परंतु या चित्रपटासाठी माधुरी नाही तर अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) दिग्दर्शकांची पहिली पसंत होत्या. मात्र, त्यांनी काही कारणामुळे या चित्रपटासाठी नकार दिला. त्यामुळे 'बेटा' चित्रपटात माधुरी दीक्षितची वर्णी लागली.
'बेटा' चित्रपटामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांच्यासह अनुपम खेर तसेच अरुणा ईराणी हे कलाकार पाहायला मिळाले. दिग्दर्शक इंद्रा कुमार यांनी हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी श्रीदेवी यांना या चित्रपटासाठी विचारणा केली होती. पण त्यावेळी श्रीदेवी इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होत्या. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर इंद्र कुमार यांनी माधुरीला हा चित्रपट ऑफर केला.
१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या एका दाक्षिणात्य चित्रपटचा 'बेटा' हा चित्रपट हिंदी रिमेक होता. या चित्रपटात श्रीदेवी आणि चिरंजीवी यांची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. म्हणून इंद्रा कुमार यांनी बेटा चित्रपटासाठी श्रीदेवी यांना ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.