या कलाकारांनी म्हटले, मी निवडणूक लढवणार ही होती केवळ अफवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 06:00 PM2019-03-24T18:00:00+5:302019-03-24T18:00:02+5:30
गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडमधील काही कलाकार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचे या कलाकारांनी स्पष्ट केले आहे.
सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहेत. प्रत्येकजण आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला लागला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात काही अभिनेते देखील उतरले आहेत. हेमा मालिनी, राज बब्बर यांनी पूर्वी देखील निवडणूक लढवली असून त्यांचा विजय देखील झालेला आहे. डॉ. अमोल कोल्हे, सपना चौधरी यांसारखे कलाकार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडमधील काही कलाकार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचे या कलाकारांनी स्पष्ट केले आहे.
बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान लोकसभा निवडणूक लढवणार असा तर्क गेल्या कित्येक दिवसांपासून लावण्यात येत होता. सलमान निवडणूक लढणार अशा बातम्या देखील आल्या होत्या. पण सलमान निवडणूक लढवणार नसून त्या केवळ अफवा असल्याचे सलमानने सोशल मीडियाद्वारे नुकतेच त्याच्या फॅन्सना सांगितले होते.
Contrary to the rumours I am not contesting elections nor campaigning for any political party..
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2019
सलमानसोबत अक्षय कुमार देखील निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात होते. पण या देखील केवळ अफवा असल्याचे स्वतः अक्षय कुमारने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते.
अक्षय कुमार लवकरच राजकारणात प्रवेश करणार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर अक्षय लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात होते. पण दिल्लीमध्ये केसरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये अक्षयने या गोष्टीबाबत उलगडा केला. लोकसभेची निवडणूक लढवण्याचा तुमचा काही प्लान आहे का असे त्याला विचारले असता त्याने सांगितले की, मी कोणतीही निवडणूक लढत नाहीये.
इंडिया टुडेने याबाबत अक्षयशी बातचित केली असता त्याने सांगितले होते की, राजकारण हा माझा अजेंडा नाहीये. मी माझ्या चित्रपटांद्वारे जी गोष्ट करू शकतो, ती कधीच राजकारणाद्वारे करू शकत नाही असे मला वाटते.
भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर अमृतसर येथून अक्षय निवडणूक लढणार असल्याच्या अफवा गेल्या कित्येक दिवसांपासून पसरल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी अक्षय कुमार, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान तसेच अनेक प्रसिद्ध व्यक्तींना टॅग केले होते आणि या ट्वीटद्वारे तुम्ही लोकांना लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्यास प्रोत्साहन करा असे सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्वीटवर अक्षयने रिप्लाय देत लिहिले होते की, तुम्ही योग्यच बोललात. लोकांच्या मतदानावरच लोकशाही अवलंबून असते. आपला देश आणि नागरिक यांच्यातील सुपरहिट प्रेमकथा मतदानाद्वारे बनण्याची गरज आहे.
Well said @narendramodi ji. The true hallmark of a democracy lies in people’s participation in the electoral process. Voting has to be a superhit prem katha between our nation and its voters :) 🙏🏻 https://t.co/rwhwdhXj1S
— Akshay Kumar (@akshaykumar) March 13, 2019