"'पुष्पा'वर ५०० करोडची फिल्म बनते, पण संभाजी महाराजांवर..." 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:22 IST2025-02-06T18:21:54+5:302025-02-06T18:22:41+5:30
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या सिनेमाबद्दल सध्या सिनेरसिकांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

"'पुष्पा'वर ५०० करोडची फिल्म बनते, पण संभाजी महाराजांवर..." 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी व्यक्त केली खंत
Laxman Utekar on Chhava Movie: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या सिनेमाबद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला 'छावा' हा सिनेमा जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने 'छावा' सिनेमाची संपूर्ण टीम वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. त्यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
नुकतीच लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये लक्ष्मण उतेकर यांनी अनेक खुलासे केले. त्यावेळी ते म्हणाले, "२०२१ मध्ये याची खरी सुरुवात झाली होती. जेव्हा पॅन्डामिकमध्ये काहीच करायला नव्हतं. तेव्हा घरी 'छावा' मी वाचायला घेतलं. त्यापूर्वी मी 'छावा' वाचलं नव्हतं. जेव्हा मी 'छावा' वाचलं तेव्हा महाराजांचं बलिदान, त्याग औरंजेबाने केलेले तिथे अत्याचार आणि कसे ते हिंदवी स्वराज्यासाठी महाराज लढले हे समजलं. मग म्हटलं आपण हे जगाला हे का सांगू शकत नाही? आपण 'ग्लेडिएटर' बघतो 'ब्रेवहार्ट' बघतो, 'ट्रॉय' बघतो आणि स्तुती सुद्धा करतो."
पुढे लक्ष्मण उतेकर म्हणाले, "चंदन तस्करी करणाऱ्या पुष्पावर ५०० कोटींची फिल्म बनते. मग छत्रपती संभाजी महाराजांवर २०० कोटींची फिल्म नाही बनवू शकत आपण?" असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.