Coronavirus Effect: कॅमे-यांचेही ‘शट डाऊन’! बॉलिवूड स्टार्सच्या एअरपोर्ट लूक, जिम लूकला सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 03:21 PM2020-03-16T15:21:29+5:302020-03-16T15:22:19+5:30
कधी नव्हे तो पापाराझींनीही घेतला ब्रेक...
कोरोना व्हायरसचा धोका जगाबरोबरच देशातही वाढता आहे. भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडलीय. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बॉलिवूडवर कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतोय. मालिका, चित्रपट, वेबसीरिज सगळ्यांचे शूटींग काही दिवस रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता तर पापाराझींनीही सुट्टीची घोषणा केली आहे.
फिल्मी स्टार्सचा पाठलाग करून त्यांचे ताजे फोटो, त्यांचा जिम लूक, एअरपोर्ट लूक कॅमे-यात कैद करणा-या फोटोग्राफर्सनी कोरोनाचा धसका घेत, काही दिवसांसाठी आपले कॅमेरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली.
‘कोरोना व्हायरस नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा कॅमेरा बंद ठेवणार आहोत. याआधी कधीही झालेले नाही. काहीही होवो, आम्ही थांबलो नाही. पण कोरोना आपल्या सर्वांसाठी मोठा धोका आहे. तो गंभीरपणे घ्यायलाच हवा. आता आमची टीम आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवेल,’ असे त्यांनी लिहिले आहे.
कोराना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने जमाव बंदीचे आदेश जारी केले आहेत. नाट्यगृह, सिनेमागृह, शॉपिंग मॉल, जिम अशी मोठ्या प्रमाणावर लोक गोळा होतात, अशी सर्व ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी चित्रपट संघटनांनी देखील पुढाकार घेतला असून १९ ते ३१ मार्चपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सही शूटींग रद्द करून घरात राहणे पसंत करत आहेत.