Lockdown Effect : कोरोनामुळे बदलले शूटींग व रिलीज शेड्यूल, आता स्टारकास्टही बदलणार!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 05:34 PM2020-04-20T17:34:43+5:302020-04-20T17:36:22+5:30
लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीवर काय परिणाम झाला, येत्या काळात आणखी काय परिणाम संभवतात?
कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग ठप्प झाले आहे. अनेक देशांत लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने जनजीवन ठप्प आहे. भारतातही वेगळी स्थिती नाही. भारतातील मनोरंजन उद्योगही कोरोना संकटामुळे प्रभावित झाला आहे. अन्य उद्योगधंद्याप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनाही कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे. या इंडस्ट्रीवर अवलंबून असलेले शेकडो कामगारही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीवर काय परिणाम झाला, येत्या काळात आणखी काय परिणाम संभवतात, ते आम्ही सांगणार आहोत.
रिलीज डेट
लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे अनेक दिवसांपासून बंद आहे आणि येत्या अनेक दिवसांपर्यंत बंद असणार आहेत. चित्रपटांच्या रिलीज डेटनुसार, चित्रपटगृहे बुक केली जातात. पण लॉकडाऊनमुळे हे सगळे शेड्यूल बिघडले आहे. काही चित्रपटांचे रिलीज ठरलेले होते. पण लॉकडाऊनमुळे ते लांबणीवर टाकण्यात आले आहे. यामुळे आगामी अनेक चित्रपटांचे रिलीजही क्रमाक्रमाने लांबणार आहे, यामुळे येत्या काळात सिनेसृष्टीला स्क्रिन्सची अडचणही सहन करावी लागणार आहे.
शूटींग शेड्यूल
सध्या अनेक चित्रपट अडकून पडले आहेत. अनेक चित्रपटांचे शूटींग सेट बनून तयार आहे. पण लॉकडाऊनमुळे येथे शूटींग होत नसल्याने निर्मात्यांना कोट्यवधीचे नुकसान होत आहे. बॉलिवूड स्टार्सचे शूटींग शेड्यूलही यामुळे प्रभावित होत आहे. चित्रपटांचेच नाही तर मालिकांचे शूटींगही बंद आहे. यामुळे अनेक मालिकांच्या नव्या एपिसोडचे प्रसारण थांबले आहे.
स्टारकास्टमध्येही होणार बदल
लॉकडाऊन संपल्यानंतर शक्य असेल तरच अनेक चित्रपटांचे शूटींग होईल. मात्र शूटींग नियमित सुरु झाल्यावर ज्या स्टार्सचे पुढील शेड्यूल ठरलेले आहे, त्यांना कदाचित एकाचवेळी अनेक प्रोजेक्टमध्ये काम करावे लागेल. अर्थात हे सोपे नाही. यामुळे काही प्रोजेक्टच्या स्टारकास्टमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या फिल्म स्टार्सच्या शूटींग डेट्स आधीच ठरलेल्या असतात. अशात रखडलेले आणि नवे असे दोन्ही प्रोजेक्ट एकाचवेळी शूट करायचे झाल्यास या स्टार्सचे वेळापत्रकही बिघडणार आहे. आधी स्टार्सला जुन्या निर्मात्यांच्या कमिटमेंट पूर्ण करणे भाग पडेल. अशात नव्या निर्मात्यांसमोर नवे स्टार्स निवडण्याचा पर्याय राहिल.