बॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही!, कंगनाने केला नवा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 05:24 AM2020-09-17T05:24:54+5:302020-09-17T06:15:57+5:30
अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनाला लाजिरवाणी विधाने थांबविण्याचे आवाहन केले. कंगनाने तिच्या विचारांची घाण स्वत:कडेच ठेवावी.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर बॉलीवूडच्या बड्या धेंड्यांशी असलेल्या ड्रग्जकनेक्शनचा पर्दाफाश झाल्यानंतर आता शय्यासोबतीची भाषाही होऊ लागली आहे. समाजवादी पक्षाच्या खा. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मंगळवारी संसदेत केलेल्या विधानाला कंगनाने ‘बॉलीवुडमध्ये अभिनेत्रींच्या करियरचा मार्ग शय्यासोबत केल्यानंतरच सुकर होतो’, अशा आशयाचे तिखट भाषेतील टिष्ट्वट करून उत्तर दिले. त्यानंतर अनेक कलावंतांनी संताप व्यक्त करीत कंगनाच्या या विधानाचा समाचार घेतला.
जया बच्चन यांनी संसदेत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना केलेल्या टिष्ट्वटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, ‘जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने आम्हाला कोणती थाळी दिली? एक थाळी मिळाली होती ज्यात दोन मिनिटांचे रोल, आयटम साँग आणि एक रोमँटिक सीन असायचा. ते सुद्धा अभिनेत्यासोबत शय्यासोबत केल्यानंतर. या इंडस्ट्रीला मी फेमिनिझम शिकवली. देशभक्ती आणि महिला केंद्रित चित्रपटांनी मी ती थाळी सजवली आहे. ही माझी स्वत:ची थाळी आहे जयाजी, तुमची नाही!’ कंगनाच्या या टिष्ट्वटनंतर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठल्याने बच्चन कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. खा, हेमामालिनी यांनीही बॉलीवुडची बदनामी केली जात असल्याचे म्हटले आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनाला लाजिरवाणी विधाने थांबविण्याचे आवाहन केले. कंगनाने तिच्या विचारांची घाण स्वत:कडेच ठेवावी. शिव्याच द्यायच्या असतील तर मला द्याव्यात. तुझी ही बडबड मी आनंदाने ऐकेन आणि खुशाल तुझ्यासोबत चिखलातली कुस्ती खेळेन. मोठ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची पहिली शिकवण आहे आणि तू तर कथित राष्ट्रवादी आहेस, असे ती म्हणाली. कंगनाने अद्याप या टिष्ट्वटला प्रत्युत्तर दिलेले नाही.
अभिनेता जॉन अब्राहमने म्हटले की, बॉलीवूड असो किंवा अन्य क्षेत्र, प्रत्येकाला स्वत:चा संघर्ष करावा लागतो. स्थान निर्माण करावे लागते. तुम्ही त्याबद्दल मनात कटुता ठेवायची की उदारता, हे तुमच्यावर आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, मी इथे काम करायला आलो आहे. तर, मनोज वाजपेयीने, मुंबईने आमच्यासारख्यांना ओळख दिली, या शहरात एक जादू आहे. तिची पाकव्याप्त भागाशी तुलना करता येणार नसल्याचे विधान केले.
अमिताभ म्हणतात, झूटे है वह लोग
अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या काव्यात्मक टिष्ट्वटवरूनही उलटसुलट चर्चा रंगली आहे. बच्चन
यांनी दिवसभरात केलेल्या शेरोशायरीच्या अंदाजातील तीन टिष्ट्वटमुळे चर्चा रंगली आहे. ‘सगळे जग बुडवू शकतो, अशी समुद्राला घमेंड होती. इतक्यात तेलाचे एक थेंब आले आणि समुद्रावर तरंगत निघून गेले’, या पहिल्या टिष्ट्वटनंतर अमिताभही बॉलीवूडमधील वादंगावर भाष्य करणार का, अशी चर्चा रंगली. मात्र, थेट नामोल्लेख वा संदर्भ न देता अमिताभ यांनी आणखी दोन टिष्ट्वट केले. यानंतर ‘जो नहीं है हमारे पास वो ‘‘ख्वाब’’ हैं; पर जो है हमारे पास वो ‘‘लाजवाब’’ हैं...’ आणि ‘‘झूठे हैं लोग जो सुबह को शाम, शाम को अंधेरे कहते हैं; देखा है हमने चिरागों से जलने वाले चिरागों को घेरे रहते है’, असे टिष्ट्वट अमिताभ यांनी केले.
करन जोहर, दीपिकाच्या चौकशीची मागणी
शिरोमणी अकाली दलचे माजी आमदार मनिंदर सिंग सिरसा यांनी अंमली पदार्थांच्या सेवनप्रकरणी करन जोहर, दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, वरुण धवन, अर्जुन कपूर आदींच्या चौकशीची मागणी केली आहे. वर्षभरापूर्वी करन जोहरच्या घरातील पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. करनने ड्रग पार्टीचा आरोप फेटाळला होता. मात्र, या व्हिडीओ संदर्भात नव्याने चौकशीची मागणी सिरसा यांनी नारकोटिक्स ब्युरोकडे केली आहे.