'माझा भाऊ मला मारहाण करायला'; रेखाने सांगितला धक्कादायक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:44 AM2022-04-19T11:44:34+5:302022-04-19T11:45:06+5:30
Rekha: कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या रेखाने वयाच्या १४ व्या वर्षापासूनच तिची फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र, या काळात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला.
आपल्या सौंदर्याच्या जोरावर केवळ प्रेक्षकच नव्हे तर अनेक अभिनेत्यांनाही भुरळ घालणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा(Rekha). गेल्या कित्येक वर्षांपासून रेखाबॉलिवूडवर राज्य करत आहे. तिच्यानंतर अनेक अभिनेत्रींनी कलाविश्वात एन्ट्री केली. मात्र, तिचं सौंदर्य आणि अभिनय विसरणं कोणालाही शक्य नाही. कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या रेखाने वयाच्या १४ व्या वर्षापासूनच तिची फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र, या काळात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला.
१९९६ मध्ये 'रंगुला रत्नम' या तेलुगू चित्रपटातून रेखाने तिच्या करिअरला सुरुवात केली. विशेष म्हणजे रेखाला अभिनयात रस नव्हता. तरीदेखील घरची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी तिने या क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर शुटिंगसाठी त्यांनी नकार दिल्यावर त्यांचा भाऊ त्यांना मारायचा असाही खुलासा एकदा त्यांनी केला होता.
भावाने केली मारहाण
एका मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करिअरविषयी भाष्य केलं. "मी नववीत असतानाच माझं शिक्षण अर्ध्यावर थांबवण्यात आलं. मला कित्येक काळ हेदेखील माहित नव्हतं की, माझ्या आईवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे मला कलाविश्वात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मला या क्षेत्राची विशेष आवड नसल्यामुळे मी चित्रपटाच्या सेटवर जाण्यास नकार द्यायचे. त्यामुळे अनेकदा माझ्या भावाने मला मारलंदेखील होतं", असं रेखा म्हणाली.
दरम्यान, १९६९ मध्ये रेखाने आईसोबत मुंबई गाठलं आणि अंजना सफर हा पहिला चित्रपट साईन केला. यावेळी रेखाचं वय केवळ १४ वर्ष होतं. मात्र, या चित्रपटानंतर त्यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली.