'या' गंभीर आजारावर कार्तिक आर्यनच्या आईने केली मात; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:44 AM2022-02-25T11:44:37+5:302022-02-25T11:45:47+5:30
Kartik Aaryan: उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा कार्तिक सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत येत आहे. कार्तिकने इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसाठी एक पोस्ट लिहिली आहे.
'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्वीटी', 'लुकाछुपी' अशा कितीतरी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) . उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा कार्तिक सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत येत आहे. कार्तिकने इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसाठी एक पोस्ट लिहिली असून ही भावनिक पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
कार्तिक त्याच्या आईच्या किती क्लोज आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. अनेकदा त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आईवरचं प्रेम व्यक्तही केलं आहे. यामध्येच कार्तिकच्या आईने कर्करोगासारख्या असाध्य आजारावर मात केली आहे. त्यामुळे कार्तिकने आईसाठी एक पोस्ट लिहिली आहे.
कार्तिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये कार्तिक आणि त्याची आई माला तिवारी कर्करोगासंबंधित एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचं दिसून येतं. या वेळी त्याची आई डान्सही करताना दिसत आहे. पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या आईने कर्करोगावर कशी मात केली हे सांगितलं आहे.
"चार वर्षांपूर्वी माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. पण त्या केमोथेरपी सेशनपासून ते या गाण्याच्या शुटिंगपर्यंतचा हा प्रवास खूप कठीण होता. आईच्या अंगी असलेली सकारात्मकता, चिकाटी आणि निर्भयता यामुळे ती पुढे आज इथे उभी आहे. आज मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या आईने कर्करोगाशी लढा दिला आणि त्यावर विजय मिळवला", असं कार्तिक म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मला तुझा खूप अभिमान आहे आई. जे लोक हे युद्ध जिंकू शकले नाहीत आणि ज्यांनी या रोगाविरुद्ध लढण्याचे धैर्य दाखवले त्या सगळ्यांप्रती मनापासून आदर व्यक्त करतो."
दरम्यान, कार्तिक बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. प्यार का पंचनामा या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेल्या कार्तिकची तरुणींमध्ये कमालीची क्रेझ आहे. सोशल मीडियावर तो कायम सक्रीय असतो.