बॉलिवूडचा 'हा' सिनेमा बनवायला लागले होते २३ वर्ष, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे याची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 03:51 PM2021-12-20T15:51:13+5:302021-12-20T16:04:40+5:30
Love and God movie : काही सिनेमे असेही आहेत जे काही कारणाने पूर्ण होऊ शकत नाही. यातील एक असा बॉलिवूड सिनेमा होता जो तयार होण्यासाठी १-२ वर्ष नाही तर तब्बल २३ वर्षे लागली होती.
(Image Credit : YouTube)
भारतीय सिने इंडस्ट्रीला आता जवळपास ११० वर्ष झाली आहेत. आतापर्यंत एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडने दिले आहेत. 'मदर इंडिया, 'मुगल-ए-आज़म', 'साहिब बीबी और ग़ुलाम', 'मेरा नाम जोकर', 'वक़्त', 'गाइड', 'प्यासा', 'शोले', 'आंधी', 'गोलमाल', 'जाने भी दो यारो', 'मासूम', 'सारांश', 'बैंडिट क़्वीन', 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे', 'लगान', 'स्वदेश', '3 इडियट्स', 'दंगल' और 'बाहुबली' अशा सिनेमांनी हिंदी सिने सृष्टीला जगभरात ओळख दिली आहे.
बॉलिवूडमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या भाषांमध्ये शेकडो सिनेमे तयार होतात. यादरम्यान काही सिनेमे तयार व्हायला ३ ते ४ महिने, काही सिनेमांना १ ते २ वर्ष असा कालावधी लागतो. पण काही सिनेमे असेही आहेत जे काही कारणाने पूर्ण होऊ शकत नाही. यातील एक असा बॉलिवूड सिनेमा होता जो तयार होण्यासाठी १-२ वर्ष नाही तर तब्बल २३ वर्षे लागली होती.
या सिनेमाचं नाव आहे लव अॅन्ड गॉड (Love and God). हा सिनेमा तयार व्हायला २३ वर्षे लागली होती. हा आजही एक रेकॉर्ड आहे. या सिनेमाला कैस आणि लैला या नावानेही ओळखलं जातं. १९८६ मध्ये रिलीज झालेल्या लव अॅन्ड गॉड सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक के. आसिफ होते. त्यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा हा एकमेव कलर सिनेमा होता. हाच सिनेमा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. यात त्यांनी लैला मजनूची कथा दाखवली होती. ज्यात अभिनेत्री निम्मी आणि संजीव कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या.
या सिनेमाची सुरूवात १९६३ मध्ये झाली होती. त्यावेळी या सिनेमातील मुख्य भूमिका अभिनेते गुरूदत्त साकारत होते. पण १९६४ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळे सिनेमाचं काम काही काळासाठी थांबलं होतं. नंतर १९७० मध्ये यात संजीव कुमार यांना मुख्य भूमिकेत घेण्यात आलं. शूटींग सुरू झाली आणि दिग्दर्शक के.आसिफ यांची तब्येत बिघली. १९७१ मध्ये त्यांचं निधन झालं.
अभिनेते गुरूदत्तसोबत या सिनेमाचं १० टक्के शूटींग पूर्ण झालं होतं. त्यानंतर संजीव कुमारसोबत पुन्हा शूटींग करण्यात आलं. केवळ १० टक्के शूटींगमध्येच ८ वर्ष इतका वेळ लागला. दिग्दर्शक के. आसिफ यांच्या मृत्यूनंतर तर असं वाटत होतं की, आता हा सिनेमा बंद होणार. पण तसं झालं नाही. साधारण १५ वर्षांनी के. आसिफ यांच्या पत्नी अख्तर आसिप यांनी निर्माता-दिग्दर्शक के.सी.बोकाडिया यांच्या मदतीने हा सिनेमा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
(Image Credit : YouTube)
के.सी.बोकाडिया यांच्या मदतीने आणि सिनेमातील सर्व कलाकारांच्या मदतीने काही महिन्यात सिनेमाचं राहिलेलं शूटींग करण्यात आलं. अखेर २७ मे १९८६ ला सिनेमा रिलीज झाला होता. पण सिनेमाच्या रिलीजवेळी यातील काही कलाकारांचे मृत्यू झाले होते. ज्यात मुख्य अभिनेते संजीव कुमार यांचाही समावेश होता. संजीव कुमार यांचं निधन सिनेमा रिलीज होण्याच्या एक वर्षाआधीच झालं होतं.
या सिनेमात संजीव कुमार आणि निम्मीसोबतच सिम्मी ग्रेवाल, प्राण, अमजद खान, अचला सचदेव आणि ललिता पवार यांच्याही भूमिका होत्या. याला संगीत नौशाद यांनी दिलं होतं तर गाणी खुमार बाराबंकवी यांनी लिहिली होती. जी मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, तलत महमूद, मन्ना डे यांनी गायली होती.