'माझे कपडे उतरवलेच आहेत, तर आता...?'; करण जोहरचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 07:42 AM2023-08-11T07:42:35+5:302023-08-11T07:43:14+5:30
Karan johar: करणला चित्रपट माफिया म्हणून ट्रोल केलं जातं या मुद्यावर तो पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan johar) याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेत येत आहे. यामध्येच आता करणने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. अलिकडेच करणने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने चित्रपट माफिया या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून करण जोहरला चित्रपट माफिया म्हणत ट्रोल केलं जातं आहे. यात अनेकांनी त्याला नेपोटिझमचा गॉड फादर असंही म्हणत टार्गेट केलं आहे. त्यामुळेच या मुद्द्यावर पहिल्यांदाच करण खुलेपणाने व्यक्त झाला आहे.
नेमकं काय म्हणाला करण?
"सोशल मीडिया असो किंवा इतर ठिकाणं मी कायमच लोकांच्या निशाण्यावर असतो. मला चित्रपट माफिया सुद्धा म्हटलं जातं. पण, या सगळ्या गोष्टीचा माझ्या आईला खूप त्रास होतो. माझी आई हिरू जोहर सोशल मीडिया, टीव्ही खूप पाहते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी माझ्याबद्दल खूप काही बोललं जातंय हे पाहून तिला त्रास होतो. गेल्या काही वर्षांपासून लोक माझ्याबद्दल खूप जास्त नकारात्मक झाल्याचं दिसून येत आहे. सातत्याने ते माझ्या विरोधात बोलतात, लिहितात",असं करण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "या काळात मला फक्त मजबूत रहायचं आहे. माझ्या आईसाठी माझ्यासाठी. लोकांनी माझे कपडे उतरवलेच आहेत. तर मग, आता लपवण्यासारखं काय राहिलं आहे. कोणासोबत भांडणार असा विचार करतो मी. प्रत्येकाच्या आयुष्यात वादळ येतात. लोकांनी त्यांच्या मनात माझ्याविषयी एक मत तयार करुन ठेवलंय. त्यांना नेमकं माहित नाही मी कसा आहे. त्यांना मी कायमच माफिया वगैरे वाटतो."
दरम्यान, करण जोहरचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येत आहे. आज करण बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि गाजलेला दिग्दर्शक, निर्माता म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याचे सिनेमा जितके गाजतात. तितकाच तो काही ना काही कारणांमुळे ट्रोल होत असतो.