दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना एका वर्षाचा तुरुंगवास; वाचा, काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:30 AM2022-04-04T11:30:35+5:302022-04-04T11:34:32+5:30
राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) हे बॉलिवूडचं मोठं नाव. तूर्तास हे नाव वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) हे बॉलिवूडचं मोठं नाव. तूर्तास हे नाव वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. निर्माता, दिग्दर्शक, लेखक अशी ओळख असलेल्या राजकुमार संतोषी यांना कोर्टानं 1 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात 22 लाख रूपयांचे चेक बाऊन्स केल्याचा (Cheque Bounce Case) आरोप आहे. याप्रकरणी सुनावणी करताना राजकोट न्यायालयाने राजकुमार संतोषी यांना 1 वर्षाची शिक्षा ठोठावली. शिवाय 60 दिवसांच्या आत नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिलेत. 2 महिन्यांच्या आत ही रक्कम न दिल्यास, त्यांना आणखी एक वर्ष तुरुंगात राहावं लागेल.
काय आहे प्रकरण
निर्माता राजकुमार संतोषी आणि राजकोटचे अनिलभाई धनराजभाई जेठानी यांच्या एक व्यवहार झाला होता. या व्यवहारादरम्यान संतोषी यांनी जेठानी यांना 22.50 लाखांचे तीन वेगवेगळे चेक दिले होते. मात्र हे तिन्ही चेक बाऊन्स झाल्याने जेठानी यांनी संतोषी यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र संतोषी यांनी नोटीसला उत्तर न दिल्यानं कलम 138 अंतर्गत संतोषीयांच्याविरोधात 17.5 लाख आणि 5 लाख रूपयांसाठी दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. राजकुमार संतोषी यांनी 2 महिन्यांत नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यास त्यांना आणखी एक वर्ष तुरुंगात काढावं लागेल.
राजकुमार संतोषी यांना घायल, पुकार, अंदाज अपना अपना यासारख्या चित्रपटांसाठी ओळखलं जातं. घायल, दामिनी, द लेजेंड ऑफ भगत सिंग, खाकी,अजब प्रेम की गजब कहानी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. संतोषी यांची ‘अंदाज अपना अपना 2’ बनवण्याची योजना असल्याची बातमी मध्यंतरी आली होती. पण या प्रकरणामुळे या मार्गात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.