'व्हॉट अ जोक', ३ दिवस शूट करुनही 'करण अर्जुन'मधून गुलशन ग्रोवर झाले होते रिप्लेस; नेमकं काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:43 PM2024-11-19T15:43:17+5:302024-11-19T15:54:20+5:30
'करण अर्जुन' (Karan Arjun Movie) हा चित्रपट बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे.
Karan Arjun Movie:'करण अर्जुन' (Karan Arjun Movie) हा चित्रपट बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. जवळपास ३० वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे सलमान आणि शाहरुखच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. येत्या २२ नोव्हेंबरला 'करण अर्जुन' सिनेमा पुनःप्रदर्शित होणार आहे.
'करण अर्जुन' चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केलं होतं. अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्यावेळी प्रचंड गाजला. अभिनेते अमरीश पुरी, राखी, काजोल, ममता कुलकर्णी यासारख्या कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटात 'भाभी जी घर पर हैं' फेम अभिनेता आसिफ शेख देखील होता. 'करण अर्जुन'मध्ये त्याने अमरीश पुरी यांच्या मुलाची भूमिका त्याने साकारली होती. त्यावेळी असिफ शेखचा ‘व्हॉट अ जोक' हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला होता. परंतु या रोलसाठी असिफ नाहीतर अभिनेते गुलशन ग्रोवर यांची वर्णी लागली होती. पण, ३ दिवस शूट केल्यानंतरही त्यांनी चित्रपटात काम केलं नाही.
'करण अर्जुन' चित्रपटात गुलशन ग्रोवर यांनी का केलं नाही काम ?
'करण अर्जुन' चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी गुलशन ग्रोवर यांच्या भूमिकेबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला होता. त्यादरम्यान राकेश रोशन म्हणाले, "गुलशन यांनी २ ते ३ दिवस चित्रपटाचं शूटिंग केलं होतं. सेटवर ते नेहमीच उशीरा यायचे. त्याचं टायमिंगच तसं होतं. त्यांना ११ च्या शूटची वेळ दिली तर ते ३ वाजता सेटवर हजर राहायचे. तेव्हा एकाचवेळी गुलशन बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांना उशीर व्हायचा." असा खुलासाही त्यांनी केला होता.
पुढे राकेश रोशन यांनी सांगितलं, "मग मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. मला हे चालणार नाही, मी वेळेच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे. तुमच्यामुळे सगळ्यांचं शूटिंग थांबतं आणि मला ते आवडत नाही. त्यानंतर गुलशन यांच्या जागी असिफ खान यांना कास्ट करण्यात आलं."