बॉलिवूड इंडस्ट्रीनं बरंच काही शिकवलं!-अभिनेत्री रिचा चढ्ढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 06:56 PM2018-12-21T18:56:19+5:302018-12-21T18:57:16+5:30

मला एका रात्रीत कधीच यश मिळवायचं नव्हतं, असं मत अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने व्यक्त केलं. ‘शकिला’ या बायोपिक चित्रपटात रिचा चढ्ढा मुख्य भूमिकेत दिसत आहे.

  Bollywood industry has taught a lot! - Actor Richa Chaddha | बॉलिवूड इंडस्ट्रीनं बरंच काही शिकवलं!-अभिनेत्री रिचा चढ्ढा

बॉलिवूड इंडस्ट्रीनं बरंच काही शिकवलं!-अभिनेत्री रिचा चढ्ढा

googlenewsNext

बॉलिवूड हे भल्याभल्यांना भूरळ घालणारे क्षेत्र. इथं काम करणं तितकंच कठीण. पण, जर तुमच्यात यश पचवण्याची क्षमता आणि हिंमत असेल तर नक्कीच इथे तुम्ही तुमचं आयुष्य समृद्ध करू शकता. मला एका रात्रीत कधीच यश मिळवायचं नव्हतं, असं मत अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने व्यक्त केलं. ‘शकिला’ या बायोपिक चित्रपटात रिचा चढ्ढा मुख्य भूमिकेत दिसत आहे. बँगलोर येथे सुरू असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जान्हवी सामंत यांनी त्यांच्याशी केलेला संवाद...

 * ‘शकीला’ या बायोपिक चित्रपटात काम करण्याचा विचार कसा आला?
- खरंतर मला तिच्यावर चित्रीत होणाऱ्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, असं मला वाटलं. ती मला भेटायला हॉटेलमध्ये आली होती. तेव्हा तिचे राहणीमान, तिची बोलण्याची लकब या सर्व गोष्टी मी न्याहाळत होते. ती खूपच साधी आहे. तसेच ती मला खूप अध्यात्मिक विचारांची देखील वाटली. मी तिला भेटून खूपच प्रभावित झाले. मला असे वाटले की, मी हिच्या बायोपिकमध्ये उत्तमरित्या काम करू शकेन.

* जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी महिलांचे प्रश्न कायम आहेत. या गोष्टीकडे तू कसे पाहतेस?
- मी आत्तापर्यंत खूप प्रवास केला आहे. वेगवेगळया देशांमध्ये फिरले आहे. अमेरिका, फ्रान्स, जपान याठिकाणी गेले आहे. तिथल्या सामाजिक, आर्थिक, कार्यालयीन बाबींचा मी अभ्यास केला आहे. वर्किंग वुमनला पुरूषांकडून होणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींना समाजही तेवढाच जबाबदार आहे, असे मला वाटते. 

* तू अभिनेत्री झाल्यावर महिलांचे विश्व, त्यांचे प्रश्न याबाबतीत जागरूक झालीस की अगोदरपासूनच होतीस?
- मला पूर्वीपासूनच महिलांचे विश्व, त्यांचे प्रश्न या सर्व गोष्टींबद्दल माहिती आहे. मी  उघडया डोळयांनी या सर्व गोष्टींकडे पाहत असते. फक्त फरक एवढाच आहे की, मी जेव्हा आता भूमिका करत आहे, तर मला ती गोष्ट अनुभवायला मिळते आहे.

* तू चित्रपटात दाक्षिणात्य भूमिका  केली आहेस. मात्र, तू खऱ्या  आयुष्यात उत्तर भारतीय आहेस. या भूमिकेमुळे तुझ्यात कोणते नवे बदल घडून आले?
- मला असं वाटतं की, मी काम करत असताना शकीला यांच्या आयुष्यातील खरेपणा जपला. मी सगळया गोष्टी जाणून घेतल्या, त्या समजून घेतल्या. माझ्यात नक्कीच अनेक बदल घडून आले. ज्यामुळे मला एक व्यक्ती म्हणून समृद्ध करतात. 

* हा चित्रपट वास्तववादी आहे की ग्लॅमरस?
-  शकीला यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा वास्तववादी चित्रपट आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोटया-मोठया गोष्टींचा आढावा म्हणजे हा चित्रपट आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा संघर्ष, त्यांचं विश्व या चित्रपटात अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात आले आहे. 

* बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तू कोणते धडे शिकलेस ?
- मला कधीही एका रात्रीत स्टार व्हायचे नव्हते. मी इंडस्ट्रीत आल्यानंतर अनेक गोष्टी शिकले, अनुभवल्या.  खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मला कायमच हळूहळूच यश मिळवायचे होते. मसान नंतर मला ग्लॅमर अनुभवायला मिळाले. पण, संयमानेच हे यश मी पचवायचे ठरवले होते.          

Web Title:   Bollywood industry has taught a lot! - Actor Richa Chaddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.