'भुल भुलैय्या-२'च्या प्रमोशनवेळी कियारा अडवाणी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीनं झाली भावूक अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 03:36 PM2022-05-16T15:36:51+5:302022-05-16T15:38:16+5:30
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिनं २०१६ साली 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिनं २०१६ साली 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. तर कियारा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. कियारा सध्या आपल्या आगामी 'भुल भुलैय्या-२' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती अभिनेता कार्तिक कार्यनसोबत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत कियारा अडवाणी हिनं तिच्या बॅकस्टेज डान्सरपासून ते अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास कथन केला. यावेळी तिनं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत सोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. सुशांत सिंह बाबत बोलताना ती भावूक देखील झालेली पाहायला मिळाली.
कियारा अडवाणी आहे पक्की अंधश्रद्धाळू! सिनेमा साईन करेपर्यंत मुळीच करत नाही ‘ही’ गोष्ट!
कियारा अडवाणी हिनं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात तिनं 'एमएस धोनी' चित्रपटाच्या शुटिंगवेळीचा एक किस्सा सांगितला. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं आणि याच काळात सुशांतनं त्याचं आजवरचं सारं स्ट्रगल कियाराला सांगितलं होतं. "आम्ही औरंगाबादमध्ये शुटिंग करत होतो आणि रात्री आठ वाजता पॅकअप झालं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता आमची फ्लाइट होती. त्यामुळे बराच वेळ आमच्याकडे होता. यावेळी आमच्यात खूप वेळ गप्पा झाल्या आणि सुशांतनं त्याचा आजवरचा प्रवास मला सांगितला", असं कियारा म्हणाली.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं झालं ब्रेकअप? समोर आले त्यांच्या नात्याबाबतचे अपडेट
"सुशांतसोबत वेळ व्यतित करण्याचा वेळ तेव्हा मला मिळाला आणि आम्ही बऱ्याच गोष्टींवर बोलत होतो. त्यानं त्याच्या आजवरच्या प्रवासाविषयी मला सांगितलं. एमएस धोनी सिनेमा त्याला कसा मिळाला. आजवरचं आयुष्य कसं राहिलं. अभिनेत्री प्रिती झिंटाच्या मागे एक बॅकडान्सरपासूनचा प्रवास ते त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण अशा सर्व गोष्टी त्यानं मला सांगितल्या होत्या. त्याच्याकडे बरीच भलीमोठी पुस्तकं देखील असायची. त्याला वाचनाची खूप आवड होती", असं कियारानं सांगितलं.
कामाच्या प्रति प्रचंड कष्टाळू अभिनेता
सुशांतचा आजवरचा प्रवास ऐकून मी त्याला म्हटलं होतं की तुझ्यावरच एखादा बायोपिक बनेल, असंही कियारानं सांगितलं. "एक दिवस तुझ्याच आयुष्यावर बायोपिक बनेल कारण तुझं आयुष्य खूप इंटरेस्टिंग आहे", असं सुशांतला म्हटल्याचं कियारानं सांगितलं. सुशांत खूप आनंदी आणि मस्तीखोर होता. पण कामाच्या बाबतीत तो खूप कष्टाळू होता, असंही कियारा म्हणाली. सुशांतबाबत बोलताना कियारा भावूक झाली होती.
सुशांतनं धोनीवर खूप रिसर्च केला होता
"सुशांतकडे एक बुकलेट होतं. ज्यात त्यानं धोनीला विचारले गेलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं नमूद होती. धोनीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत खूप अभ्यास केला होता", असं कियारानं सांगितलं. २०१६ साली भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि चित्रपटाचा तुफान पसंती मिळाली होती. सुशांतसोबत चित्रपटात कियारा अडवाणी, दिशा पाटणी आणि अनुपम खेर यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. सुशांतला चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्त्कृष्ट कलाकाराचा स्क्रीन पुरस्कार देखील मिळाला होता. तसंच फिल्मेअर पुरस्कारासाठी देखील नामांकन मिळालं होतं.