बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार अनवर सागर यांचे निधन, अक्षय कुमारसाठी लिहिले होते हे सदाबहार गाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 10:06 AM2020-06-04T10:06:40+5:302020-06-04T10:08:09+5:30
अनवर यांनी बॉलिवूडला अनेक लोकप्रिय गाणी दिली.
बॉलिवूडचे लोकप्रिय संगीतकार वाजिद खान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ आता गीतकार अनवर सागर यांनीही अंतिम श्वास घेतला. बुधवारी वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात अंतिम श्वास घेतला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर यांना रूग्णालयात आणले गेले, त्यापूर्वीच काही क्षण आधी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले होते.
इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेडने त्यांच्या निधनाचे वृत्त देत, त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Veteran lyricist and IPRS member Anwar Sagar has passed away. Known for writing songs like 'Vaadaa Raha Sanam', he also penned lyrics for iconic movies like #Vijaypath & #Yaraana. Our thoughts & prayers are with his family in this difficult time. May his soul #RIP.
— Indian Performing Right Society Limited (@IPRSmusic) June 3, 2020
‘अनुभवी गीतकार आणि आयपीआरएसचे सदस्य राहिलेले अनवर सागर यांचे आज निधन झाले. त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी लिहिली होती. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,’असे इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेडने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अनवर यांनी बॉलिवूडला अनेक लोकप्रिय गाणी दिली. 80 ते 90 च्या दशकात अजय देवगणच्या ‘विजयपथ’, डेव्हिड धवन यांच्या ‘याराना’, जॅकी श्रॉफ स्टारर ‘सपने साजन के’ आणि अक्षय कुमारचा सुपरहिट सिनेमा ‘खिलाडी’ तसेच ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या सिनेमासाठी त्यांनी गाणी लिहिली होती. अक्षय कुमारच्या ‘खिलाडी’ या सिनेमातील ‘वादा रहा सनम’ हे त्यांनी लिहिलेले गीत आजही सिनेप्रेमींना साद घालते. या गाण्याने अनवर सागर यांना खरी ओळख दिली. 90 च्या दशकातले हे गाणे आजही लोकांना आवडते. लोकप्रिय गाण्यांच्या यादीत या गाण्यांचा समावेश आहे.