तब्बल ३० वर्षानंतर 'आशिकी गर्ल' करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक? म्हणते - 'मी बराच काळ...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 05:13 PM2024-05-20T17:13:01+5:302024-05-20T17:17:11+5:30
ब्लॉकबस्टर 'आशिकी' चित्रपटामुळे अभिनेत्री रातोरात स्टार बनली.
Anu Aggrawal : ९० च्या दशकात आपल्या अदाकारिने बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल. 'आशिकी' या चित्रपटाने अभिनेत्रीला खरी ओळख मिळवून दिली. बोल्डनेस आणि बेधडक भूमिकांमुळे बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये तिची गणना होते. यातच अनु अग्रवाल पुन्हा चर्चेत आली आहे.
ब्लॉकबस्टर 'आशिकी' चित्रपटामुळे अभिनेत्री रातोरात स्टार बनली. साधारणत: १९९० मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. तिचा हा सिनेमा त्यावेळी प्रचंड गाजला. पण नियतीने या नायिकेच्या नशीबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. वर्षभरातच अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला आणि तिचं सिनेसृष्टीतील करियर पणाला लागलं. त्या भीषण अपघातामुळे अनु अग्रवाल २९ दिवस कोमात होती.
जवळपास ३ महिने तिच्यावर उपचार सुरू होते. त्यातून अभिनेत्री सुदैवाने बचावली. पण, त्या अपघातामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बिघडला. त्यामुळे तिला ओळखणंही कठीण झालं होतं. या सर्वप्रकारमुळे अभिनेत्री प्रचंड नाराज झाली आणि बॉलिवूडच्या 'आशिकी गर्लने' इंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत केलं. आता लवकरच ही अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. ३० वर्षांच्या तपस्येनंतर 'आशिकी गर्ल' सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करणाऱ्याची इच्छा तिने दर्शवली आहे.
इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत संकेत दिले आहेत. 'पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी किती प्रयत्नशील आहेस? या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, 'मी यासाठी अजिबात प्रयत्न करत नाही. मी बराच काळ सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. आता जवळपास ३० वर्ष मी सिनेसृष्टीपासून अंतर ठेवून आहे'. यानंतर तिने बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शकांकडे काम देण्याची मागणी केली आहे. तसेच ती म्हणाली, "मी सर्व दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगू इच्छिते, की मला काम द्या. तुम्ही मला सोशल मीडियाच्या आधारेही संपर्क करू शकता. तसेच मी चित्रपट तसेच ओटीटीवर काम करायला तयार आहे'. अनु अग्रवाल आता सोशल मीडियावर सक्रिय असते. तसंच ती योग प्रशिक्षणही देते. तिचे इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.