प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता धीरजलाल शाह यांचं निधन, २० दिवसांपासून ICU मध्ये सुरू होते उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 09:34 AM2024-03-12T09:34:29+5:302024-03-12T09:40:12+5:30
बॉलिवूड निर्माता धीरजलाल शाह यांचं निधन झालं आहे. ११ मार्च (सोमवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता धीरजलाल शाह यांचं निधन झालं आहे. ११ मार्च (सोमवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली. धीरजलाल शाह यांचे भाऊ हसमुख शाह यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, धीरजलाल शाह यांना करोना झाला होता. करोनामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्यांच्या किडनीवरही याचा परिणाम झाला होता. त्यामुळे शरीरातील काही अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. गेल्या २० दिवसांपासून ते ICUमध्ये होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी(१२ मार्च) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धीरजलाल शाह यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली होती. 'कृष्णा', 'विजयपथ', 'द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ स्पाय', 'खिलाडी' अशा सिनेमांचे ते निर्माता होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनावर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे.