रणवीर-सोनाक्षीचा 'तो' चित्रपट पाहून डिप्रेशनमध्ये गेला होता रॅपर बादशाह; घ्यायचा औषधांचा डबल डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 05:09 PM2024-11-18T17:09:36+5:302024-11-18T17:15:22+5:30
लोकप्रिय रॅपर बादशाहने एका मुलाखतीत त्याच्या मानसिक स्वास्थाविषयी धक्कादायक खुलासा केला.
Badshah: बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध रॅपर,गायक बादशाह (Badshah) कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. 'डीजे वाले बाबू', 'लाल गेंदा फूल', 'पानी पानी जुगनु', 'हाय गरमी', 'लेट्स नाचो' या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. चाहत्यांमध्ये त्याच्या गाण्यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. परंतु एक वेळ अशी होती जेव्हा तो खूपच डिप्रेशनमध्ये असायचा. याचा खुलासा त्याने एका मुलाखती केला होता.
बादशहाने 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मानसिक स्वास्थावर भाष्य केलं. त्यादरम्यान त्याने सांगितलं की, "मी 'लूटेरा' चित्रपट पाहिल्यानंतर त्यामुळे तणावात गेलो. त्याच्या नादात मी औषधांचा डबल डोस घेतला होता."
पुढे तो म्हणाला, "मग मी माझ्या डॉक्टरांना फोन केला आणि सगळं सांगितलं. त्यांनी मी म्हणालो, एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. लूटेरा चित्रपट पाहिला आणि त्यामुळे मी अस्वस्थ झालो. शिवाय मी औंषधांचे डबल डोसही घेतले. त्यावर डॉक्टरांनी मला आता 'रांझना' चित्रपट पाहू नकोस असा मजेशीर सल्ला दिला होता. कारण तो चित्रपटही तितकाच भावनिक होता".
बहिणीकडे मागितली होती मदत
या मुलाखती दरम्यान बादशहाने पॅनिक अटॅकचाही उल्लेख केला. त्याविषयी सांगताना तो म्हणाला, "भारतात परत येत असताना मला अतिविचारामुळे सारखा घाम येत होता. माझी अशी अवस्था पाहून विमानातील काही प्रवाशांना माझ्या परिस्थितीबद्दल अंदाज आला होता. असं असतानाही मी तेव्हा गाणं लिहायला घेतलं आणि स्वत: ला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग घरी आल्यानंतर पुन्हा तसाच त्रास सुरू झाला. मी खूप घाबरलो होतो. तेव्हा बहिणाला मी म्हणालो होतो, 'मला वाचव, काहीतरी मला होतंय' असे शब्द माझ्या तोंडून निघाले होते. ती परिस्थिती फारच भयानक होती. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मला ६ महिने लागले होते.
सोशल मीडियावर बादशाहचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी गाण्यांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.