Video: 'स्टार झालास म्हणून इतका माज बरा नाही'; चाहत्याला सलमानने दिली अत्यंत वाईट वागणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:23 IST2022-06-02T15:20:41+5:302022-06-02T15:23:16+5:30
Salman khan: सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमानतळावर सलमानला एक चाहता भेटायला आला. परंतु, सलमानने त्याला अत्यंत वाईट वागणूक दिली.

Video: 'स्टार झालास म्हणून इतका माज बरा नाही'; चाहत्याला सलमानने दिली अत्यंत वाईट वागणूक
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) सोशल मीडियावर कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी चित्रपटांमुळे तर कधी एखाद्या वादग्रस्त प्रकरणामुळे तो सातत्याने चर्चेत येत असतो. मात्र, यावेळी सलमानला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे. इतकंच नाही तर स्टार झालास म्हणून इतका माज करणं बरं नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला चांगलं सुनावलंदेखील आहे.
आपले आवडते कलाकार कुठेही दिसले की चाहते त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे सरसावतात. परंतु, अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या मूडनुसार या चाहत्यांना वागणूक देत असतात. असाच प्रकार सलमान आणि त्याच्या चाहत्यासोबत घडला आहे. विमानतळावर सलमानला फोटोफ्रेम गिफ्ट करायला आलेल्या चाहत्याकडे सलमानन सपशेल दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर त्याच्यासोबत फोटो काढतानाही भाईजानच्या कपाळावर आठ्या होत्या जे पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमानतळावर सलमानला पाहताच एक चाहता त्याच्या जवळ आला आणि त्याला फोटोफ्रेम गिफ्ट करु लागला. या फ्रेममध्ये सलमान आणि त्याची आई सलमा यांचा एक छानसा फोटो होता. मात्र, हा फोटो पाहूनही सलमानने या चाहत्याकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर त्याच्यासोबत फोटो काढतानाही तो नाईलाजाने उभा राहिला. यावेळी त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या स्पष्टपणे दिसून येत होत्या.
काय म्हणाले नेटकरी?
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सलमानवर नाराजी व्यक्त केली आहे. 'मला पहिले सलमान खूप आवडायचा. पण, आजपासून तो आवडेनासा झालाय', असं एकाने म्हटलं आहे. तर, 'हे असं वेडंवाकडं तोंड करायला काय झालं', 'स्टार झालास म्हणून एवढा माज बरा नाही', अशा अनेक कमेंट करत सलमानला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.