Bollywood: वादाचा 'पडदा' अन् ट्रोलिंगचा 'पिक्चर'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 12:13 PM2023-06-25T12:13:39+5:302023-06-25T12:15:02+5:30
Bollywood: आदिपुरुष चित्रपटावरून उफाळून आलेला वाद थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे चित्रपट आणि वाद हे जुने नाते वारंवार अधोरेखित होताना दिसत आहे. कथानक, दृश्ये, पात्र, संवाद, ऐतिहासिक संदर्भ एवढेच काय, तर सिनेमाला दिलेल्या नावावरून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत.
- महेश घोराळे
(उपसंपादक)
आदिपुरुष चित्रपटावरून उफाळून आलेला वाद थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे चित्रपट आणि वाद हे जुने नाते वारंवार अधोरेखित होताना दिसत आहे. कथानक, दृश्ये, पात्र, संवाद, ऐतिहासिक संदर्भ एवढेच काय, तर सिनेमाला दिलेल्या नावावरून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत अनेक चित्रपटांवर बायकॉट मोहिमांपासून ते कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वादाच्या पडद्यावर ट्रोलिंगचा 'पिक्चर' पाहायला मिळत आहे.
सम्राट पृथ्वीराज (३ जून २०२२) - अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' प्रदर्शित होण्याआधीच वादात अडकला होता. राजपूत करणी सेनेने सिनेमाच नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे चित्रपटाचे नाव 'बदलून 'सम्राट पृथ्वीराज' करण्यात आले.
थैंक गॉड (२५ ऑक्टोबर २०२२) - पौराणिक कथांवर आधारित 'थैंक गॉड' रिलीजपूर्वीच वादात सापडला होता, यामध्ये अजय देवगणने चित्रगुप्ताची भूमिका साकारली चित्रगुप्त आधुनिक अवतारात दाखविल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. चित्रगुप्ताची खिल्ली उडवल्याबद्दल एका वकिलाने तक्रार नोंदविण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
'द कश्मीर फाइल्स (११ मार्च २०२२)- हिंदू पंडितांवरील अत्याचाराची गोष्ट या चित्रपटातून मांडण्याचा ● प्रयत्न केला. समर्थकांच्या मते काश्मीरमध्ये लोकांवर झालेल्या अत्याचाराचं हे वर्णन आहे. तर, काहीच्या मते, चित्रपट वास्तवाला धरून नाही. तो एका धर्माच खलनायकीकरण करून द्वेष निर्माण करतो.
आदिपुरुष (१६ जून २०२३) - 'वाल्मीकी रामायण महाकाव्यावर आधारित 'आदिपुरुष' चित्रपटात असभ्य भाषेमुळे भावना दुखावल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे. देवतांच्या प्रतिमा मलीन, पात्रांचे विकृतीकरण सुमार व्हीएफएक्समुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.
द केरळ स्टोरी - (५ मे २०२३) - मुलींचे ब्रेनवॉश, धर्म परिवर्तन दाखवून धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न गेला. चित्रपटावर एका धर्माविषयी द्वेष निर्माण करण्याचा आरोप केला गेला. प्रकरण कोर्टात गेले. पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटावर राज्यात बंदी घातली होती. तामिळनाडूतील चित्रपटगृहांमध्येही तो दाखविला गेला नाही.
पठाण ( २५ जानेवारी २०२३)- शाहरुख आणि दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण मधील बेशरम रंग गाण्यातील दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरुन वाद सुरू झाला होता.