प्रसिद्ध गायक विशाल ददलानीचा अपघात; कॉन्सर्टही केली रद्द; पोस्ट शेअर करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:07 IST2025-02-14T11:02:28+5:302025-02-14T11:07:50+5:30
प्रसिद्ध गायक- संगीतकार विशाल ददलानीचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

प्रसिद्ध गायक विशाल ददलानीचा अपघात; कॉन्सर्टही केली रद्द; पोस्ट शेअर करत दिली माहिती
Vishal Dadlani: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक- संगीतकार विशाल ददलानीचा (Vishal Dadlani) अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुण्यातील कॉन्सर्टदेखील रद्द करावा लागला आहे. दरम्यान, विशाल ददलानीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विशाल ददलानीचा 'अर्बन शोज' हा कॉन्सर्ट २ मार्च २०२५ ला आयोजित करण्यात आला. परंतु या कॉन्सर्टपूर्वी त्याचा अपघात झाल्याचं समजतंय. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विशालने या बातमीची पुष्टी केली आहे.
नुकतीच विशाल ददलानीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे."माझा एक छोटासा अपघात झाला आहे. मी लवकरच परत येईन. अशी माहिती त्याने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली आहे. याशिवाय 'अर्बन शो या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून सुद्धा चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे माहिती देत सांगण्यात आलंय की, "आम्हाला कळविण्यात खेद होत आहे की विशाल ददलानी यांच्या अपघातामुळे २ मार्च २०२५ रोजी आयोजित विशाल आणि शेखर यांचा 'अर्बन शो म्युझिक कॉन्सर्ट' पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत."
पुढे त्यांनी लिहिलंय की, "तुमच्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत आणि तु्म्ही समजून घ्याल अशी आशा व्यक्त करतो. हा कॉन्सर्ट पुन्हा आयोजित करण्यात येईल शिवाय आम्ही लवकरच कॉन्सर्टची नवीन तारीख जाहीर करू." अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याची पाहायला मिळतेय. दरम्यान, विशाल ददलानीच्या या अपघातानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तो लवकर बरा व्हावा, यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
वर्कफ्रंट
विशाल ददलानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर विशाल-शेखर या जोडीने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेकसुपरहिट गाणी दिली आहेत. याशिवाय तो अनेक सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे.