हरयाणवी स्टाईलमधील बॉलीवूड स्टार्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 07:02 PM2016-10-20T19:02:40+5:302016-10-20T19:06:10+5:30
आमिर खानच्या बहुचर्चित ‘दंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. ‘दंगल’ मध्ये तो हरयाणवी पहेलवानाच्या रूपात दिसणार आहे. यासाठी ...
अक्षय कुमार
२०१६ हे साल निश्चितच अक्षय कुमारचे आहे. सलमान खान ‘सुल्तान’ मध्ये व आमिर खान ‘दंगल’मध्ये ज्या प्रदेशातील भूमिका साकारत आहेत, त्याच प्रदेशाची भूमिका यापूर्वी अक्षय कुमारने साकारली आहे. अक्षय कुमारच्या २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉस’ या चित्रपटात त्याने हरयाणवी युवकाची भूमिका केली होती. त्याच्या या भूमिकेचे हरियाणात चांगलेच कौतुक करण्यात आले.
सलमान खान
सलमान खानने ‘सुल्तान’ या चित्रपटात हरयाणवी नायकाची भूमिका साकारली होती. कुस्तीच्या आखाड्यात उतरलेला सलमान खान सर्वांनाच भावला. सुल्तानचा संपूर्ण प्लॉट हरियाणाच्या कुस्तीवर आधारित होता. हरयाणवी भाषा व लकबीसाठी सलमानने खास मेहनतही घेतली होती. याच चित्रपटात अनुष्का शर्माने हरयाणवी मुलीची भूमिका केली होती. दोघांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला होता.
कंगणा राणौत
‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ या चित्रपटात कंगना राणौत हरयाणवी मुलगी बनली होती. या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका होती. कानपूरची तनू त्रिवेदी-शर्मा व हरयाणाची कुसुम सांगवान ऊर्फ दत्तो. कंगना ही हरयाणवी दत्तोच्या भूमिकेत फिट बसली होती. हा चित्रपट पाहिल्यावर अमिताभ बच्चन यांना देखील दत्तोच्या रूपात असलेल्या कंगनाला ओळखता आले नव्हते.
रणदीप हुड्डा
सबरजीत या चित्रपटात रणदीप हुड्डाने हरयाणवी जाट ‘सबरजीत’ची भूमिका केली. रणदीप हरियाणाचा असल्याने भूमिकेसाठी त्याला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मात्र, त्याची हरयाणवी स्टाईल या चित्रपटातून पाहायला मिळाली. याच चित्रपटात ऐश्वर्या रायने सबरजीतच्या बहिणीची भूमिका केली होती. तिला ही भाषा फारशी जमली नाही.
रितेश देशमुख - जेनेलिया डिसूझा
महाराष्ट्रीयन असलेल्या रितेश देशमुखने ‘तेरे नाल प्यार हो गया’ या चित्रपटात हरयाणवी युवकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जेनेलिया डिसूझाने देखील हरयाणवी मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटानंतर रितेश आणि जेनेलियाने लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, काही संवादाव्यतिरिक्त रितेश व जेनेलियाला हरयाणवी स्टाईल जमली नाही. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नीतू चंद्रा
‘वन टू थ्री’ या विनोदी चित्रपटात नीतू चंद्रा हिने ‘इन्स्पेक्टर मायावती चौटला’ ही भूमिका साकारली होती. मायावती चौटाला ही भूमिका हरयाणवी महिलेची असल्याने तिला भाषा शिकावी लागली. तिच्या या भूमिकेला चांगलेच पसंत करण्यात आले. नीतूची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. तिच्या या भूमिकेचा आधार घेत ‘एफआयआर’ नावाची मालिका टीव्हीवर सुरू झाली.