Bollywood : 'या' युद्धमय चित्रपटांनी शिकविले देशप्रेम !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 11:22 AM2018-03-16T11:22:06+5:302018-03-16T16:52:06+5:30
-रवींद्र मोरे देशभक्तिला नेहमी युद्धाशी संबंधीत पाहिले जाते. हे चित्र फक्त भारतातच नव्हे तर तमाम देशातही असेच चित्र बघावयास ...
देशभक्तिला नेहमी युद्धाशी संबंधीत पाहिले जाते. हे चित्र फक्त भारतातच नव्हे तर तमाम देशातही असेच चित्र बघावयास मिळते. भारतात विशेषत: भारत-पाक युद्धाला देशभक्तिशी जोडले जाते. या युद्धात शत्रुंना नेस्तनाबुत करताना पाहणे हे कोणत्याही भारतीयांसाठी गर्वाची बाब असते. ही गोष्ट चित्रपट निर्मातेही चागंल्याप्रकारे जाणतात. म्हणूनच युद्धावर आधारित चित्रपट बनविण्याकडे निर्मात्यांचा कल असतो. विशेष म्हणजे या चित्रपटातून देशप्रेमाचीही शिकवण मिळत असते. जाणून घेऊया या चित्रपटांबाबत...
* हकीकत (१९६४)
चेतन आनंद द्वारा दिग्दर्शित हकीकत या चित्रपटात बलराज साहनी आणि धर्मेंद मुख्य भूमिकेत दिसले होते. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित हा चित्रपट होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला भारतात बनलेल्या सर्वात उत्कृष्ट युद्धावर आधारित चित्रपट म्हणून ओळखला जातो. दमदार स्क्रीप्टमुळे या चित्रपटाला १९६५ मध्ये नॅशनल अवॉर्डदेखील मिळाला होता.
* बॉर्डर (१९९७)
दिग्दर्शक जेपी दत्ता द्वारा बनविण्यात आलेला हा चित्रपट युद्धावर आधारित सर्वात लोकप्रिय भारतीय चित्रपट गणला जातो. हा चित्रपट म्हणजे भारत-पाक दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धाच्या काळातील सत्य घटनेवर आधारित चित्रपट होय. सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, सुरेश ओबेरॉय आदी दिग्गज स्टार्स असलेल्या या चित्रपटाने खरी देशभक्ति काय ही शिकवण दिली होती, शिवाय चित्रपटातील गाण्यांद्वारेही भारतीय सैनिकांची विरता दर्शविण्यात आली होती.
* 1971 (२००७)
मनोज वाजपेयी आणि रवि किशन सारख्या दमदार अभिनेत्यांच्या दमदार भूमिकेने बनलेला '1971' हा चित्रपट १९७१ मध्ये भारत-पाक दरम्यान झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमिवर आधारित आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपटाचा नॅशनल अवॉर्ड आपल्या नावे केला आहे. १९७१ मध्ये युद्धादरम्यान पाकिस्तानी आर्मीद्वारा कैद सहा भारतीय सैनिक कसे स्वत:ची सुटका करतात यावर आधारित हा चित्रपट आहे. अतिशय रोमांचपूण दृष्यांनी बनलेला हा चित्रपट खरी देशभक्ति शिकवितो.
* लक्ष्य (२००४)
१९९९ मध्ये भारत-पाक दरम्यान झालेल्या कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमिवर आधारित हा चित्रपट आहे. यात ऋतिक रोशन, प्रीति झिंटा तसेच अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तरने केले असून युद्धावर आधारित एक चांगला चित्रपट म्हणून ओळखला जातो.
* एलओसी कारगिल (२००३)
जेपी दत्ता द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे १९९९ मध्ये भारत-पाक दरम्यान झालेल्या आॅपरेशन विजय आणि बॅटल आॅफ टोलोलिंगच्या पार्श्वभूमिवर आधारित आहे. यात संजय दत्त, अजय देवगन, करण नाथ, सैफ अली खान, सुनील शेट्टी आदी दिग्गज स्टार्सनी दाखविलेली देशभक्ति खरंच प्रेरणादायी ठरते.