Bollywood Throwback: हँडसम हिरो हवा म्हणत रेखानं चक्क अमिताभला रिजेक्ट केलं होतं ...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:00 AM2021-11-26T08:00:00+5:302021-11-26T08:00:06+5:30
रेखा (Rekha ) अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आजही ती त्यांच्यावर प्रेम करते. पण कधीकाळी याच रेखाने अमिताभ बच्चन यांना सिनेमातून काढून टाकलं होतं.
बॉलिवूडचं सर्वाधिक गाजलेलं आणि आज इतक्या वर्षानंतरही चर्चेत राहणार प्रेमप्रकरण कोणतं? तर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व रेखा (Rekha ) यांचं. होय, एकेकाळी या अफेअरची प्रचंड चर्चा झाली आणि आजही होते. अमिताभ व रेखा कधीच आपल्या प्रेमप्रकरणावर बोलले नाहीत. पण याऊपरही रेखा व अमिताभ या जोडीचे किस्से चवीनं चघळले गेलेत. असं म्हणतात की, रेखा अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आजही ती त्यांच्यावर प्रेम करते. पण कधीकाळी याच रेखाने अमिताभ बच्चन यांना सिनेमातून काढून टाकलं होतं.
हा किस्सा केव्हाचा तर अमिताभ बच्चन यांच्या स्ट्रगल काळातला. होय, रेडिओवर आवाज चांगला नाही म्हणून अमिताभ यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं. यानंतरही त्यांनी बरेच नकार पचवले होते आणि अशात राजेश खन्ना आणि धर्मेन्द्र यांची चलती असलेल्या काळात अमिताभ स्वत:चं स्थान निर्माण करू पाहत होते. 12 सिनेमे केलेत. पण त्यातून दोनच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेत. यापैकी एक होता ‘आनंद’. या चित्रपटाचं श्रेयही राजेश खन्नाच्या नावावर जमा झालं होतं.
1972 साली ‘दुनिया का मेला’ हा चित्रपट अमिताभ यांना मिळाला. नवा सिनेमा मिळाल्याने अमिताभ आनंदात होते. या चित्रपटात अमिताभ हिरो असणार होते आणि रेखा त्यांची हिरोईन. पण रेखाने पहिल्यांदा अमिताभ यांना पाहिलं आणि लगेच प्रोड्यूसरला हिरो बदला म्हणून फर्मान सोडलं. मला हँडसम हिरो हवा, तरच मी काम करेल, असं तिनं ठणकावून सांगितलं. असं का तर, अमिताभ रेखाला अजिबात आवडले नव्हते. किरकोळ बांधा आणि ताडासारख्या उंचीचा हिरो तिला तिच्यासोबत नको होता. आता रेखाला कोण नाही म्हणणार? निर्मात्यांनी तिच्या म्हणण्यानुसार, अमिताभ यांना सिनेमातून काढून टाकलं आणि त्यांच्या जागी संजय खान यांना घेतलं.
अखेर कसाबसा ‘दुनिया का मेला’ तयार झाला. पण तो रिलीज व्हायला 2 वर्ष वाट पाहाची लागली.
यादरम्यान अमिताभ यांना ‘जंजिर’ मिळाला आणि अमिताभ यांची गाडी सूसाट पळत सुटली. इतकी की, अमिताभ यांनी सुपरस्टारचा दर्जा मिळाला. रेखाच्या त्या सिनेमाचं काय तर तो 1974 सालचा सर्वात मोठा फ्लॉप ठरला.
पुढचा किस्सा सगळ्यांना ठाऊक आहेच, ज्याला नाकारलं, त्याच अमिताभ नावाच्या पुरूषावर रेखा भाळली. ‘दो अजनबी’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं आणि तिथून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं.