बॉलीवूड-अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि पैसा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 08:42 AM2023-10-15T08:42:58+5:302023-10-15T08:43:15+5:30
- मनोज गडनीस विशेष प्रतिनिधी लीवूड आणि अंडरवर्ल्ड हा कधीही न सुटणाऱ्या कोड्यासारखा विषय आहे. एकमेकांसोबत राहणे ही त्यांची अपरिहार्यता ...
- मनोज गडनीस
विशेष प्रतिनिधी
लीवूड आणि अंडरवर्ल्ड हा कधीही न सुटणाऱ्या कोड्यासारखा विषय आहे. एकमेकांसोबत राहणे ही त्यांची अपरिहार्यता आहे की, त्यांचे साटेलोटे आहे हा संशोधनाचा विषय आहे. १९६० च्या दशकात मुंबईचे अंडरवर्ल्ड चालविणाऱ्या हाजी मस्तानपासून ते दाऊदपर्यंत कायमच हे संबंध चर्चेत राहिले आहेत. मात्र, आता त्याला निमित्त ठरले आहे ते अंडरवर्ल्डच्या कथित सहकार्यावर उभ्या राहिलेल्या महादेव ॲपचे. या ॲपच्या प्रमोशनमध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार गुंतले आहेत. एवढेच नाही तर त्या ॲपच्या निर्मात्याने २०० कोटी रुपये खर्चून केलेल्या लग्नालादेखील या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावत आपली अदाकारी साकारली आहे.
मुळात या दोघांच्या संबंधांची उकल करायची असेल १९६० च्या दशकापर्यंत मागे डोकवावे लागेल. त्यावेळी हाजी मस्तान याने त्याच्या पत्नीला चित्रपटात भूमिका मिळावी, म्हणून अनेक सिनेमा निर्मात्यांना अर्थसाहाय्य केले होते. याद्वारे पहिल्यांदा गुन्हेगारी विश्व आणि सिनेसृष्टीच्या संबंधांची सुरुवात झाल्याचे मानले जाते. त्यानंतर गुन्हेगारी विश्वातून पैसे घेत सिनेमाची निर्मिती करणे ही काही बॉलीवूडसाठी नवीन गोष्ट नाही. २००० साली कायद्यामध्ये बदल झाला आणि चित्रपट उद्योगांना बँकांनी कर्जासाठी दरवाजे खुले केले; पण त्या अगोदर चित्रपटांना अर्थसाहाय्य करण्यात अंडरवर्ल्डचा वाटा मोठा होता. चित्रपटांना कर्जासाठी वित्तीय संस्था उपलब्ध झाल्या तरी, अर्थसाहाय्यासाठी बॉलीवूडमधली लुडबूड मात्र अंडरवर्ल्डने कमी केली नाही. कधी आपल्या लाडक्या अभिनेत्रीला काम देण्यासाठी असेल किंवा मग काळा पैसा पांढरा करण्यासाठी असेल. निर्मात्यांना अंडरवर्ल्डचे नियमित फोन येऊ लागले. असे फोन आल्यानंतर निर्मात्याची इच्छा असो वा नसो, त्यांना ते पैसे स्वीकारावे लागायचे हे वास्तव आहे.
एका मुलाखतीमध्ये भारतीय सिनेसृष्टीतील एका दिग्गज दिग्दर्शकाने सांगितले होते की, त्याकाळचा क्वचितच एखादा निर्माता असेल त्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीकडून पैसे घेतले नसतील. अशा अनेक गाजलेल्या सिनेमांतील अंडरवर्ल्डची गुंतवणूक हा पोलिसांसाठी शोधाचा आणि डोकेदुखीचा विषय ठरला होता. तर, त्यांच्याकडून पैसे घेणे ही केवळ सिनेसृष्टीचीच गरज नव्हती. तर, त्यावेळी परदेशात कमावलेला पैसा भारतात पांढरा करण्यासाठीदेखील सिनेमाद्वारे अर्थसाहाय्य करण्याची सुलभ युक्ती गुन्हेगारांनी अवलंबल्याची माहिती एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. दाऊद परदेशात गेल्यानंतर अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूडच्या नात्याचे दृश्य संबंध उजेडात आले. त्या काळी परदेशातील पार्ट्यांमध्ये बॉलीवूडचे नामवंत कलाकार दिसू लागले. एकेकाळी पैशांच्या व्यवहारांसाठी निर्माण झालेल्या संबंधांची किनार हळूहळू बदलू लागली. बॉलीवूडमधील अभिनेतेच नव्हे तर अभिनेत्रींच्या डॉन मंडळींसोबतच्या संबंधांच्या चर्चा पुढे आल्या. ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमामुळे गाजलेली अभिनेत्री मंदाकिनी आणि दाऊदच्या संबंधांची चर्चा झाली. मोनिका बेदी, ममता कुलकर्णी, सोना अशा काही अभिनेत्रींचीही चर्चा झाली. एका ज्येष्ठ माजी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, याला आणखी एक किनार आहे. मुंबईतून अंडरवर्ल्डमधील वरच्या फळीतले लोक जेव्हा परदेशात स्थलांतरित झाले, त्यावेळी मुंबईत दबदबा कायम ठेवण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम सिनेसृष्टीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अनेक निर्माते, दिग्दर्शक, प्रथितयश अभिनेते यांना धमक्या देण्यास सुरुवात झाली. अर्थातच या धमक्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आणि अंडरवर्ल्डचा हेतू काही प्रमाणात साध्य झाला.
अंडरवर्ल्ड ऑनलाइन सट्टेबाजीत
आता काळ बदलला. सायबर विश्व नावाच्या प्रतिसृष्टीत आपण सारे स्थिरावलो. या सृष्टीत असलेला पैसा, त्यामधील गुन्हेगारीत असलेली क्लिष्टता याचा पुरेपूर फायदा अंडरवर्ल्डने घेतला आहे. ऑनलाइन सट्टेबाजीच्या रूपाने त्यांनी यामध्ये प्रवेश केला.
फुटकळ लोकांना हाताशी धरून हजारो कोटींचा व्यवसाय सुरू केला आणि याच्या जोरदार मार्केटिंगसाठी मग पुन्हा एकदा बॉलीवूडकडेच मोर्चा वळवला.
अनेक नामवंत कलाकारांना कोट्यवधींचे मानधन देऊन त्यांना आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले की, बॉलीवूडलाही हे हवेच होते हा प्रश्न पुन्हा बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड ही एकमेकांची अपरिहार्यता की साटेलोटे, या प्रश्नाच्याच उंबरठ्यावर आपल्याला नेऊन ठेवतो.