किस्सा: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पुरता वेडा झालेला संजय दत्त; रागाच्या भरात ऋषी कपूर यांना करणार होता मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 06:00 PM2022-07-31T18:00:00+5:302022-07-31T18:00:00+5:30
Sanjay Dutt: या दोन दिग्गज कलाकारांमध्ये एकेकाळी मोठा गैरसमज निर्माण झाला होता. ज्यामुळे संजय दत्त चक्क ऋषी कपूर यांना मारायला निघाला होता.
बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor). या दोघांनीही आपल्या कसदार अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे या दोन्ही कलाकारांचा स्वतंत्र असा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे या दोन दिग्गज कलाकारांमध्ये एकेकाळी मोठा गैरसमज निर्माण झाला होता. ज्यामुळे संजय दत्त चक्क ऋषी कपूर यांना मारायला निघाला होता.
सध्या सोशल मीडियावर ऋषी कपूर आणि संजय दत्त यांचा एक जुना किस्सा चर्चेत येत आहे. यात अभिनेत्री टीना मुनीममुळे (Tina Munim) संजय ऋषी कपूर यांच्यावर संतापला होता. एकेकाळी संजय दत्त टीना मुनीमच्या प्रेमात अक्षरश: वेडा झाला होता. त्यामुळे सेटवर तासंतास तो तिच्यासोबत गप्पा मारायचा. या काळात टीना आणि ऋषी कपूर याची मुख्य भूमिका असलेला 'कर्ज' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिवर तुफान गाजत होता. ज्यामुळे टीना रातोरात सुपरस्टार झाल होती. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर टीना- ऋषी ही जोडी प्रेक्षकांना विशेष आवडू लागली. त्यामुळे अनेक निर्माते, दिग्दर्शक या दोघांना एकत्र कास्ट करायचा प्रयत्न करत होते. मात्र, त्या दोघांमधील ही मैत्री संजय दत्तला खटकत होती.
'कर्ज' सुपरहिट ठरल्यानंतर टीना-ऋषी यांच्या नात्याचीही चर्चा रंगू लागली होती. ही जोडी एकमेकांना डेट करते असंही म्हटलं जात होतं. यात टीना आणि ऋषी यांचं एकत्र नाव जोडलं जात असल्यामुळे संजय दत्त प्रचंड संतापला होता. त्यामुळे रागाच्या भरात प्रचंड मद्यपान करुन तो मध्यरात्री ऋषी कपूर यांना मारायला निघाला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिनेता गुलशन ग्रोवरदेखील होते.
संजयने खरंच ऋषी कपूरला केली मारहाण?
मध्यरात्री संजय, ऋषी यांच्या घरी त्यांना मारायला निघाल्याची माहिती अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना मिळाली आणि त्या तात्काळ संजयची भेट घेत त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. त्या काळात ऋषी कपूर यांचं नाव जरी टीना मुनीमसोबत जोडलं जात असलं तरीदेखील खऱ्या आयुष्यात ते नीतू कपूर यांच्यावर प्रेम करत होते. हे सत्य नीतू यांनी संजयला सांगितल्यानंतर त्याचा राग निवळला आणि त्याची चूक त्याच्या लक्षात आली.
दरम्यान, नीतू कपूर यांनी समजूत काढल्यानंतर संजय दत्त माघारी फिरला. मात्र, संजय आणि टीना मुनीम यांचं नातंही फार काळ टिकलं नाही. काही कारणास्तव ही जोडी विभक्त झाली.