बोनी कपूर यांच्या घरातही पोहाचला कोरोना; जान्हवी, खुशीचीही झाली टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:40 AM2020-05-20T10:40:57+5:302020-05-20T10:42:04+5:30
बोनी कपूर, जान्हवी व खूशी यांच्यासह अन्य स्टाफची सुद्ध्द्ध कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.
कोरोनाचा फास दिवसेंदिवस आवळत चाललाय. आता बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला आहे. या यादीतले एक नाव म्हणजे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर. होय, बोनी कपूर यांच्या लोखंडवालास्थित ग्रीन एकर्समधील घरात काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. बोनी कपूरसह अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, खूशी कपूर यांचे चाहते चिंताग्रस्त झालेत. यानंतर बोनी कपूर यांनी याबाबत खुलासा केला.
‘आम्ही मेडिकल टीमने दिलेल्या निर्देशांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. महाराष्ट्र सरकार व बीएमसीने तातडीने पाऊले उचललीत, त्याबद्दल आभार. आम्ही सूचनांचे पालन करत आहोत. आमच्या घरी काम करणारा चरण लवकरच बरा होईल, असा मला विश्वास आहे. माझी मुलं ठीक आहेत. माझा अन्य स्टाफही ठीक आहे. आत्तापर्यंत आमच्यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणे नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, लॉकडाऊनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरात आहोत. आम्ही घराबाहेर गेलोच नव्हतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही अफवा पसरू नयेत, यासाठी मी स्वत: याबद्दल माहिती देतोय, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, बोनी कपूर यांच्या घरात काम करणा-या चरण नामक व्यक्तीची प्रकृती बिघडली. यानंतर बोनी यांनी तात्काळ 23 वर्षांच्या चरणची कोरोना टेस्ट केली. त्याची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर बोनीने सोसायटी, पालिकेला याबद्दल माहिती दिली. टेस्ट केल्यानंतर त्याला क्वारंटाइन करण्यात आले होते. बोनी कपूर, जान्हवी व खूशी यांच्यासह अन्य स्टाफची सुद्ध्द्ध कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. अद्याप त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पण तरीही 14 दिवसांसाठी बोनी कपूर व त्यांचे कुटुंब सेल्फ क्वारंटाइनमध्ये राहणार आहे.