बोनी कपूरच्या घरी आणखी दोन कोरोना रूग्ण; जान्हवी, खुशीचाही आला रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:47 AM2020-05-22T11:47:09+5:302020-05-22T11:49:27+5:30
धक्कादायक! बोनी कपूर यांच्या कुटुंबाची वाढली चिंता
कोरोनाचा फास दिवसेंदिवस आवळत असताना अलीकडे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूऱ यांच्या लोखंडवालास्थित ग्रीन एकर्समधील घरात काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. ही व्यक्ती म्हणजे बोनी कपूर यांच्याकडे काम करणारा एक घरगडी. गुरुवारी रात्री बोनी कपूर यांच्या घरी काम करणारे आणखी दोन नोकर कोरोना पॉझिटीव्ह आढळले.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, बोनी यांच्या घरी काम करणा-या आणखी दोघांना कोरोनाने ग्रासल्याचे स्पष्ट आहे. धक्कादायक म्हणजे, या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय आणि त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घरी कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याची माहिती बोनी कपूर यांनी खुद्द दिली होती, ‘आम्ही मेडिकल टीमने दिलेल्या निर्देशांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहोत, महाराष्ट्र सरकार व बीएमसीने तातडीने पाऊले उचललीत, त्याबद्दल आभार. आम्ही सूचनांचे पालन करत आहोत. आमच्या घरी काम करणारा चरण लवकरच बरा होईल, असा मला विश्वास आहे. माझी मुलं ठीक आहेत, माझा अन्य स्टाफही ठीक आहे. आत्तापर्यंत आमच्यात आतापर्यंत आमच्यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणे नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, लॉकडाऊनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरात आहोत. आम्ही घराबाहेर गेलोच नव्हतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. कुठल्याही अफवा पसरू नयेत, यासाठी मी स्वत: याबद्दल माहिती देतोय, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले होते.
जान्हवी, खुशीचा रिपोर्ट निगेटीव्ह
दरम्यान बोनी कपूर यांच्या घरी पहिला पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यानंतर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
बोनी कपूर अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. नोकर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर जान्हवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी घरात राहणे हाच आमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे़ सर्वजण सुरक्षित राहा, असे तिने लिहिले होते. यावर अभिनेता कार्तिक आर्यन याने कमेंटही केली होती. योग्यवेळी कृती केल्याबद्दल तुमचे कौतुक करावेच लागेल. जागृक असणे हेही महत्त्वाचे आहे, असे कार्तिकने आपल्या कमेंटमध्ये लिहिले होते.