सनी देओलच्या 'बॉर्डर २' मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री, 'फौजी' बनून करणार देशाचं रक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:40 IST2024-09-06T13:40:15+5:302024-09-06T13:40:50+5:30
वरुण धवननंतर आणखी एक अभिनेता 'बॉर्डर 2'च्या बटालियनमध्ये सामील

सनी देओलच्या 'बॉर्डर २' मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री, 'फौजी' बनून करणार देशाचं रक्षण
१९९७ साली प्रदर्शित झालेला 'बॉर्डर' सिनेमा आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. यातील गाणी तर अजरामर ठरली. देशप्रेम जागवणारा असा हा सिनेमा होता. आता २७ वर्षांनी 'बॉर्डर'च्या सीक्वेलची घोषणा झाली आहे. अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' च्या यशानंतर 'बॉर्डर २' (Border 2) ची घोषणा झाली. यामध्ये सनी देओल (Sunny Deol) तर मुख्य भूमिकेत आहेच शिवाय अभिनेता वरुण धवनचंही (Varun Dhawan) नाव काही दिवसांपूर्वी जाहीर झालं. आता आणखी एका अभिनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोण आहे तो अभिनेता?
सनी देओलने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आणखी एका अभिनेत्याचं 'बॉर्डर 2' मध्ये स्वागत केलं आहे. तो अभिनेता आहे दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh). 'फौजी दिलजीत दोसांझचं बॉर्डर 2 च्या बटालियन मध्ये स्वागत' असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे. सोनू निगमच्या आवाजातील गाण्याने व्हिडिओ सुरु होतो. नंतर दिलजीतचा डायलॉग सुरु होतो. 'इस देश की तरफ उठने वाली हर नजर झुक जाती है खौफ से, इन सरहदो पर जब गुरु के बाज पहरा देते है' या डायलॉगने अंगावर शहारे येतात. बॉर्डर २ चा हा आणखी एक व्हिडिओ पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.
आतापर्यंत सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांची नावं फायनल झाली आहेत. आणखी कोणते अभिनेते या बटालियनमध्ये सामील होतात हे पाहणं महत्वाचं आहे. आयुष्मान खुरानाच्या नावाचीही सध्या चर्चा आहे. अनुराग सिंग सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर जे पी दत्ता, भूषण कुमार यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
दिलजीत दोसांझने गेल्या काही सिनेमांमधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. तो उत्तम गायक तर आहेच शिवाय उत्कृष्ट अभिनेताही आहे. 'चमकीला' या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. तसंच पंजाबीतही त्याचे काही सिनेमे गाजले.