Brahmastra Advance Booking: बघूया की थांबूया?, मुंबईतले सिनेप्रेमी संभ्रमात; बघा, मल्टिप्लेक्सच्या 'अंदर की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:52 PM2022-09-08T17:52:57+5:302022-09-08T17:53:42+5:30
बॉलिवूडचं नवदाम्पत्य अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट उद्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहांत धडकणार आहे.
बॉलिवूडचं नवदाम्पत्य अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट उद्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहांत धडकणार आहे. पब्लिसिटीसाठी जे-जे शक्य, ते-ते निर्माता-दिग्दर्शक आणि कलाकारांनी केलंय. बॉयकॉट ट्रेंडमुळेही 'ब्रह्मास्त्र'ची चर्चा होतेय. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवरची 'मंदी' दूर करण्याचं काम ब्रह्मास्त्र करेल, असं अनेकांना वाटतंय. पहिल्या दिवशीचं १० कोटी रुपयांचं Advance Booking झाल्याचा दावा काही जण करत आहेत. पण, मुंबईतल्या मल्टिप्लेक्समध्ये डोकावलं, तर सगळंच आलबेल दिसत नाही.
कोरोनाच्या आधी, बिग बजेट सिनेमांचे शुक्र, शनि, रविवारचे शो तुफान गर्दीत व्हायचे. कोरोनानंतर हे चित्र बदलल्याचं याआधीच्या काही सिनेमांवेळी पाहायला मिळालं. ओटीटी, बॉयकॉट, साऊथची मुसंडी वगैरे अशी अनेक कारणं त्यामागे आहेत. म्हणूनच, बॉलिवूड सिटी असलेल्या मुंबईत 'ब्रह्मास्त्र'चं Advance Booking कुठे, किती झालंय याचा आढावा आम्ही घेतला.
'ब्रह्मास्त्र'च्या ॲडव्हान्स बुकिंगला तुलनेनं चांगला प्रतिसाद मिळतोय, हे खरं मानलं, तरी 'बुक माय शो'वर अद्याप थिएटरमधील शो हाउसफुल झाल्याचं चित्र फारसं पाहायला मिळत नाहीये. मालाड येथील आयनॉक्स थिएटरमध्ये 'ब्रह्मास्त्र'च्या ७-८ शोला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
अंधेरी येथील सिनेपोलिस थिएटरमध्ये 'ब्रह्मास्त्र'चे १४ शो आहेत. त्यातील सकाळी ९ वाजताच्या शोची जास्त तिकिटं विकली गेली आहेत. मात्र, बाकीच्या शोची बरीच तिकिटं शिल्लक आहेत. घाटकोपर येथील पीव्हीआरमध्ये १० शो आहेत. तिथे अद्याप तिकिट विक्रीला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. फोर्ट येथील स्टर्लिंग थिएटरमध्येही तिकिट विक्री थंडच दिसतेय. लोअर परेल येथील पीव्हीआरमध्ये ॲडव्हान्स बुकिंग हळूहळू वाढताना दिसत आहे.
आलिया भटने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर काही वेळातच, पीव्हीआर सिनेमाजच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे उघड झाले की या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉलमध्ये होणार आहे आणि त्याचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगची माहिती समोर आल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत शोची सर्व तिकिटं विकली गेलीत. एका सूत्राने याबाबत मीडियाला सांगितले की, या शोची तिकिटं अवघ्या ४ मिनिटांत विकली गेली आहेत. ही ३१५ सीटर स्क्रीन आहे आणि आम्हाला एक तासात तिकिटे विकण्याची अपेक्षा होती, परंतु ५ मिनिटांपेक्षा कमी वेळात शो हाऊसफुल झाला आहे. कारण या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना रणबीर आणि आलियाला लाईव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे.
एकंदर, ब्रह्मास्त्र बघूया की थांबूया, अशा द्विधा मनःस्थितीत प्रेक्षक आहेत. बॉयकॉट बॉलिवूड हे त्याचं एक कारण आणि ओटीटी हे दुसरं. या दोन संकटांमधून 'ब्रह्मास्त्र' कसा मार्ग काढणार, जबरदस्त कलाकृतीच्या द्वारे प्रेक्षकांना थिएटरमध्ये यायला भाग पाडणार की पाठोपाठ आपटलेल्या सिनेमांच्या यादीत आणखी एक नाव जोडलं जाणार, हे येत्या दोन-तीन दिवसांत कळेलच!