Brahmastra Box Office Collection Day 10: ‘ब्रह्मास्त्र’ची 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, 10 व्या दिवशी कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:50 PM2022-09-19T12:50:38+5:302022-09-19T12:51:58+5:30
Brahmastra Box Office Collection Day 10 : रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडमध्येही जबरदस्त कमाई केली आहे. अगदी 10 व्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय.
रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) व आलिया भटच्या ( Alia Bhatt ) ‘ब्रह्मास्त्र’ने ( Brahmastra ) बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडमध्येही जबरदस्त कमाई केली आहे. अगदी 10 व्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय. रिलीजच्या 10 व्या दिवशी या चित्रपटाने 16.30 कोटींचा बिझनेस केला आणि याचसोबत अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ 200 कोटी क्लबमध्ये सामील झाला.
10 दिवसांत 212.44 कोटी
तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड व हिंदी पाचं भाषेत ‘ब्रह्मास्त्र’ने 10 दिवसांत 212.44 कोटींची कमाई केली आहे. एकट्या हिंदी व्हर्जनने 10 दिवसांत 194 कोटींची कमाई केली आहे. देशातील मेट्रो सिटीमध्ये या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. याचं कारण म्हणजे, ‘ब्रह्मास्त्र’ला फाईट देण्यासाठी कोणताही मोठा सिनेमा सध्या नाही.
पहिल्याच दिवशी चित्रपटाने 36.42 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 31 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 173.22 कोटी रुपयांचा बिझनेस केला. दुसºया आठवडा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला राहिला. गेल्या सोमवारपासून ‘ब्रह्मास्त्र’च्या कमालीला ओहटी लागली होती. पण शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली. शनिवारी तर कमाई 50 टक्के वाढली. रविवारी शनिवारपेक्षा 15 टक्के वाढ झाली. दुसºया आठवड्यात शुक्रवारी चित्रपटाने 10.6 कोटी कमावले, शनिवारी 15.38 कोटींचा गल्ला जमावला. रविवारी 16.3 कोटींचा बिझनेस केला.
मोडला विक्रम
दमदार कमाईसोबतच ‘ब्रह्मास्त्र’ने 2022चा सर्वात मोठा हिट ‘भुल भुलैय्या 2’चा रेकॉर्ड मोडीत काढला. रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ने ‘भुल भुलैय्या 2’च्या लाईफटाईम बिझनेसचा आकडा पार केला आणि याचसोबत ‘ब्रह्मास्त्र’ 2022 चा सेकंड हायेस्ट हिंदी ग्रॉसर सिनेमा बनला. ‘ब्रह्मास्त्र’च्या यशाने बॉलिवूडच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. बॉलिवूडवर ‘बायकॉट’चं संकट घोंघावत असताना ‘ब्रह्मास्त्र’ने अशी विक्रमी कमाई केलेली पाहून सगळेच खुश्श आहेत.
‘ब्रह्मास्त्र’मधील व्हीएफएक्स इफेक्ट्स लोकांना आवडले आहेत. हाच या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. सिनेमावर 410 कोटींचा खर्च झाला. यापैकी 350 कोटी चित्रपट बनवण्यावर खर्च झालेत आणि 60 कोटी नुसत्या प्रमोशनवर खर्च करण्यात आले.