जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ वादात, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 04:58 PM2018-07-03T16:58:27+5:302018-07-03T17:00:48+5:30
जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट वादात सापडला आहे. गत २८ जूनला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. पण या ट्रेलरनेच वाद निर्माण केला आहे.
जॉन अब्राहमचा चित्रपट आणि वाद हे जणू आता समीकरण झालयं. आता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट वादात सापडला आहे. गत २८ जूनला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. पण या ट्रेलरनेच वाद निर्माण केला आहे. होय, हैदराबादेतील भाजपाच्या एका नेत्याने या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
भाजपा अल्पसंख्यंक आघाडी शहर महासचिव सैय्यद अली जाफरी यांनी हा एफआयआर दाखल केला. ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रेलरमध्ये मोहरमच्या दृश्याला चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात आल्याचा दावा, तक्रारीत करण्यात आला आहे. ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट भ्रष्टाचारावर आधारित आहे. मोहरमच्या दृश्याचे याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मेकर्सनी हे दृश्य अनावश्यकरित्या टाकले. याशिवायही चित्रपट पुढे जावू शकतो. ट्रेलरमधील हे दृश्य संपूर्ण शिया समुदायाच्या भावना दुखावणारे आहे, असे यात म्हटले आहे.
यापूर्वी जॉनचा ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’ हा चित्रपट वादात सापडला होता. अर्थात त्यामागचे कारण जरा वेगळे होते. निर्मात्यांसोबतचे मतभेद त्याला कारणीभूत ठरले होते.
‘सत्यमेव जयते’ या जॉनच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, या चित्रपटात जॉन भ्रष्टाचाराविरोधात लढताना दिसणार आहे. यात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी तो एकटाच मैदानात उतरतो खाकीच्या रक्षणासाठी खाकीच्याच विरोधात उभा राहतो.
भरपूर अॅक्शन आणि ड्रामा याने रंगलेला ‘सत्यमेव जयते’ स्वातंत्र्य दिनी रिलीज होतो आहे.