सुशांत सिंह राजपूत प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ, CBI रिया विरोधात पुन्हा नोंदवू शकते FIR
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 12:21 PM2020-08-06T12:21:25+5:302020-08-06T12:33:57+5:30
सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर दाखल केली आहे.
बिहार सरकारच्या शिफारसीवरुन केंद्राने बुधवारी सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील तपास सीबीआय चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार याप्रकरणी सीबीआय बिहार पोलिसांनी नोंदवलेली एफआयआर पुन्हा नोंदवू शकते ज्यात फसवणूक, विश्वासघात आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर दाखल केली आहे ज्यामध्ये त्याने अभिनेत्रीवर मुलाचा पैसा हडपण्याचा आणि कुटुंबीयांपासून दूर करुन आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
बिहार पोलिसांकडून केसची फाइल व इतर कागदपत्रे गोळा करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी पटना येथे पोहोचतील, अशी अपेक्षा आहे. रिया चक्रवर्तीला पुन्हा चौकशीसाठी बोलविले जाऊ शकते आणि यासाठी तिला समन्स पाठविले जाऊ शकते. तथापि असे म्हटले जात आहे की, यापूर्वी सीबीआय सर्व कागदपत्रे गोळा करण्याची तयारी करीत आहे आणि त्यानंतरच ती या केसमध्ये पुढील चौकशी केली जाईल.
ईडी 7 ऑगस्टला करणार रियाची चौकशी
रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसतायेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिला चौकशीसाठी बोलवले आहे.यापूर्वी रियाने तिचं घर सोडून आपल्या कुटूंबासह फरार झाली होती.रिया आपल्या मुंबईतल्या घरी परतली आहे. ईडी सुशांत प्रकरणाचा तपास सतत्याने करते आहे.