GK पुस्तकात अक्षय कुमार, कतरीना कैफचे काय काम? संतप्त पालकांचा ‘कडक’ सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:00 PM2020-05-11T13:00:21+5:302020-05-11T13:04:35+5:30
वाचा, काय आहे ही नवी भानगड
सीबीएसईच्या जनरल नॉलेजच्या पुस्तकांमध्ये बॉलिवूड स्टार्सचे फोटो आणि त्यांच्या खरे नावांचा कॉलम समाविष्ट करण्यात आला आणि तेलंगणात नवा वाद उफाळून आला़. यानंतर तेलंगणा शालेय विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आता हे काय प्रकरण आहे, ते जाणून घेऊ यात.
तर तेलंगणातील इयत्ता 7 वीच्या जनरल नॉलेजच्या पुस्तकात अक्षय कुमार, अजय देवगण, कतरीना कैफ अशा अनेक फिल्मी स्टार्सच्या ख-या नावांवर आधारित एक चॅप्टर समाविष्ट करण्यात आला आहे. यात पुस्तकातील एका स्वाध्यायात कतरीना, दिलीप कुमार, अक्षय कुमार, रजनीकांत, रेखा, अजय देवगण, तब्बू, टायगर श्रॉफ, गोविंदा अशा सगळ्यांचे फोटो आहेत आणि विद्यार्थ्यांना या स्टार्सचे खरे नाव सांगा, असा प्रश्न विचारला गेला आहे. सोबत उत्तराचे पर्यायही दिले आहेत. तर नेमक्या याच चॅप्टरवरून वाद सुरु झाला.
7 वीच्या जनरल नॉलेजच्या अभ्यासक्रमात या प्रश्नाची गरजच काय? फिल्मी स्टार्सची खरी नावे माहित करून वि़द्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात काय भर पडणार आहे? असे सवाल पालकांनी लावून धरले. केवळ इतकेच नाही तर जनरल नॉलेजच्या नावाखाली अशी मूर्खपणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात असल्याबद्दल अनेक पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हेच नाही जनरल नॉलेजच्या पुस्तकात डोरेमॉन आणि शिंचॅन अशा कार्टून शोशी संबंधित प्रश्नांवरही पालकांनी आक्षेप घेतला. तिस-या इयत्तेच्या एका प्रायव्हेट पब्लिकेशनच्या पुस्तकात कार्टून पात्राशी निगडीत हे प्रश्न दिले आहेत.
हा वाद समोर येताच तेलंगणा सरकारने या संदर्भात सीबीएसई, दिल्लीकडे विचारणा केली आहे. सीबीएसईअंतर्गत शाळांचा अभ्यासक्रम सीबीएसई निश्चित करते. राज्य सरकारशी याच्याशी संबंध नाही, असे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.